अमेरिकेत कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या नऊ लाखांवर पोहोचली आहे. देशातील बळींच्या संख्येत दोन महिन्यांहून कमी अवधीत एक लाख बळींची भर...

अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या नऊ लाखांवर पोहोचली

वॉशिंग्टन – अमेरिकेत कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या नऊ लाखांवर पोहोचली आहे. देशातील बळींच्या संख्येत दोन महिन्यांहून कमी अवधीत एक लाख बळींची भर पडल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. कोरोनाच्या नव्या बळींमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेले तसेच लस न घेतलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेला ‘ओमिक्रॉन’चा सर्वाधिक फटका बसल्याचा दावाही आरोग्यतज्ज्ञ तसेच वैद्यकीय गटांनी केला आहे. दरम्यान, जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ३९ कोटींवर पोहोचली असून ५७ लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

नऊ लाखांवर

नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिअंट समोर आला होता. या नव्या व्हेरिअंटमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेला सुरुवात झाली होती. या लाटेत सर्वाधिक फटका अमेरिका व युरोपला बसल्याचे समोर येत आहे. अमेरिकेत दर २४ तासांमध्ये आढळणारी रुग्णसंख्या सुमारे १० लाखांपर्यंत गेली होती. तर प्रतिदिनी दगावणार्‍यांची संख्या सरासरी तीन हजारांनजिक गेली होती.

दोन महिन्यांच्या आत अमेरिकेत एक लाखांहून अधिक नव्या बळींची नोंद झाली असून दगावणार्‍यांची संख्या ९,०४,२२८पर्यंत पोहोचली आहे. शुक्रवारी २४ तासांमध्ये अमेरिकेत ३,८९५ बळींची नोंद झाल्याची माहिती यंत्रणांनी दिली. अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या सात कोटी, ६१ लाखांवर गेली आहे. शुक्रवारी अमेरिकेत तीन लाखांहून अधिक रुग्ण नोंदविण्यात आले असून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखांहून जास्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या व बळींची नोंद या दोन्ही बाबतीत अमेरिका आघाडीवर असल्याचे उघड झाले आहे.

नऊ लाखांवर

अमेरिकेतील कोरोनाच्या वाढत्या व्याप्तीमागे कडक हिवाळा व लसीकरणाला होणारा विरोध ही प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येते. सध्या रुग्णालयात दाखल होणार्‍या व बळी जाणार्‍या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण लस न घेतलेले असल्याचे समोर आले आहे. मिसिसिपी, साऊथ कॅरोलिना, टेनेसी, मिशिगन, इंडियाना, ओहिओ यासारख्या प्रांतांमध्ये जेमतेम ६० टक्क्यांच्या जवळपास लसीकरण झाले असून सर्वाधिक रुग्णसंख्या व बळी याच प्रांतांमध्ये आढळत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारताना कोरोनाचा प्रभावी मुकाबला करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यांच्याच कार्यकाळात कोरोनाची तीव्रता व प्रभाव वाढल्याचे समोर आले असून राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन अपयशी ठरल्याचे मत अमेरिकी नागरिकांनी व्यक्त केले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info