युक्रेनी लष्कराचे खेर्सनवरील प्रतिहल्ले रशियाने उधळले

- २६ रणगाडे, दोन लढाऊ विमानांसह युक्रेनचे पाचशेहून अधिक जवान संपविल्याचा रशियाचा दावा

मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या लष्कराने सोमवारपासून खेर्सन प्रांतात सुरू केलेली प्रतिहल्ल्यांची मोहीम उधळल्याचा दावा रशियाने केला. युक्रेन सरकारने, दक्षिण युक्रेनसह इतर भागांमधून रशियन जवानांना पळवून लावू व युक्रेनचा ध्वज फडकवू, असे दावे ठोकले होते. खेर्सनमधील रशियन सैन्याला दणका देत चार गावे ताब्यात घेतल्याचा दावाही युक्रेनकडून करण्यात आला. पण रशियाच्या संरक्षण विभागाने हे दावे फेटाळले असून उलट युक्रेनी लष्करालाच मोठा फटका बसल्याचे जाहीर केले.

रशियाने २०१४ साली ताब्यात घेतलेला क्रिमिआ व युक्रेनला जोडणारा प्रांत म्हणून खेर्सन ओळखण्यात येतो. ‘ब्लॅक सी’ व ‘अझोव्ह सी’ या दोन्ही सागरी क्षेत्रांचा खेर्सन प्रांतात समावेश होतो. डिनायपर नदीचा भाग असलेल्या हा प्रांत युक्रेनमध्ये ‘फ्रूट बास्केट’ म्हणून प्रसिद्ध आहे. रशियाने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनमध्ये सुरू केलेल्या मोहिमेत काही आठवड्यांमध्येच या प्रांतावर नियंत्रण मिळविले होते. सागरी क्षेत्रावरील नियंत्रण व क्रिमिआचा विचार करता युक्रेनसाठी हा प्रांत अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

गेल्या महिन्याभरात डोन्बास अथवा इतर क्षेत्रात रशियाला मोठे यश मिळालेले नाही. त्याचवेळी पाश्चिमात्य देशांकडून मिळणाऱ्या प्रचंड शस्त्रसहाय्यामुळे युक्रेनी लष्कराची बाजू काही प्रमाणात सावरल्याचे दिसत आहे. या शस्त्रसहाय्याच्या बळावरच युक्रेनी फौजांनी खेर्सन प्रांतावर पुन्हा ताबा मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. युक्रेनच्या या मोहिमेला अमेरिकेचे विशेष सहाय्य असल्याचे दिसते आहे.

सोमवारपासून युक्रेनने खेर्सनवर प्रतिहल्ले चढविण्यास सुरुवात केली. त्यानंतर २४ तासांमध्ये रशियाची खेर्सनमधील आघाडी तोडण्यात यश आल्याचा दावा युक्रेनने केला. खेर्सन प्रांतात एकाच वेळी पाच जागांवरून हल्ले करण्यात येत असल्याचे युक्रेन सांगत आहे. सोमवारी उशिरापर्यंत खेर्सनमधील चार गावे ताब्यात घेतली असून रशियाची मोठी हानी घडविल्याची माहिती युक्रेनने दिली. या गावांमध्ये प्रावडिनसह नोवा दिमित्रिवका, अर्खन हेल्स्क व तोमिआना बल्का यांचा समावेश असल्याचे युक्रेनने सांगितले. या ताब्यानंतर डिनायपर नदीवरील रशियाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचेही युक्रेनी यंत्रणांनी जाहीर केले. या हल्ल्यांसाठी युक्रेनने ‘हायमार्स रॉकेट सिस्टिम्स’, हॉवित्झर्स तसेच हवाई व क्षेपणास्त्र हल्ल्यांचा वापर केल्याचे सांगितले जाते.

या हल्ल्यानंतर सोमवारी रात्री युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाला नवा इशारा दिला. ‘युक्रेनी फौजा रशियाच्या सीमेपर्यंत रशियन जवानांचा पाठलाग करतील. आमची सीमारेषा बदललेली नाही. रशियन सैन्याला पळ काढणे भाग पडेल’, असे झेलेन्स्की यांनी बजावले होते. युक्रेनी राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्तोविच यांनी, प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेतून रशियन फौजांना भरडून काढू अशा इशारा दिला.

युक्रेनी नेतृत्व व लष्कराकडून करण्यात आलेले दावे रशियाने फेटाळले आहेत. युक्रेनने खेर्सनमध्ये सुरू केलेली प्रतिहल्ल्यांची मोहीम अपयशी ठरल्याचे रशियाने जाहीर केले. रशियन फौजांनी युक्रेनी लष्कराचे २६ रणगाडे, ३०हून अधिक सशस्त्र वाहने व दोन लढाऊ विमाने उद्ध्वस्त केल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले. रशियाने दिलेल्या प्रत्युत्तरात युक्रेनचे ५६०हून अधिक जवान मारले गेल्याची माहितीही रशियन संरक्षण विभागाने दिली. खेर्सनमध्ये युक्रेनी हल्ल्यांना प्रत्युत्तर देतानाच रशियाने ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह तसेच डोन्बासमधील स्लोव्हिआन्स्क भागातही हल्ले केले.

दरम्यान, रशियाच्या ताब्यात असलेल्या झॅपोरिझिआ अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनकडून हल्ला झाला असावा, असे संकेत अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांनी तसे संकेत दिले. रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना युक्रेनकडून प्रकल्पाच्या परिसरात हल्ला झाला असावा, असे अमेरिकी अधिकाऱ्याने म्हटले आहे. रशियाच्या माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. अणुप्रकल्पावरील हल्ल्यामुळे झालेले नुकसान दाखविणारे काही सॅटेलाईट फोटोग्राफ्स नुकतेच प्रसिद्ध झाले होते. यात प्रकल्पाच्या एका भागातील छताची हानी झाल्याचे दाखविण्यात आले आहे. युक्रेनमधील या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक भेट देणार असून मंगळवारी हे पथक युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाले आहे.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info