आंतरराष्ट्रीय स्तरावर महाशक्तींची भूमिका निभावण्यास रशिया व चीन सक्षम

- पुतिन व जिनपिंग यांचा दावा

समरकंद – जागतिक व्यवस्थेला एकध्रुवीय बनविण्याचे प्रयत्न अस्वीकारार्ह असून रशिया व चीन हे दोन्ही देश आंतरराष्ट्रीय स्तरावर महाशक्तींची भूमिका निभावण्यास सक्षम असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व शी जिनपिंग यांनी केला. उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये आयोजित ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) पार्श्वभूमीवर रशिया व चीनच्या राष्ट्राध्यक्षांची स्वतंत्र बैठक पार पडली. युक्रेनमधील संघर्ष व तैवान मुद्यावरून पाश्चिमात्य देश रशिया तसेच चीनवर दडपण आणत असताना झालेली ही भेट आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणारी ठरते.

महाशक्तींची भूमिका

गेले काही वर्षे रशिया व चीन जागतिक व्यवस्थेतील पाश्चिमात्य देशांच्या प्रभावाला आव्हान देण्याचे प्रयत्न करीत आहेत. चीनने व्यापार तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात आपले वर्चस्व वाढविण्यात यश मिळविले असून आफ्रिका व लॅटिन अमेरिकी देशांमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. हाँगकाँगवर निरंकुश नियंत्रण मिळवून चीनने पाश्चिमात्य देशांचे दडपणही झुगारल्याचे चित्र उभे केले. तर दुसऱ्या बाजूला क्रिमिआवरील ताबा व ‘डिडॉलरायझेशन’साठी पुढाकार आणि नाटोच्या वर्चस्वाला आव्हान देत रशियाने आपला एकेकाळचा दबदबा पूर्ण संपला नसल्याचे दाखवून दिले आहे.

महाशक्तींची भूमिका

पाश्चिमात्य देशांविरोधातील आघाडी या मुद्यावर रशिया व चीन हे दोन्ही देश जवळ येण्यास सुरुवात झाल्याचे गेल्या काही वर्षातील घटनांवरून दिसून येत होते. युक्रेनमधील संघर्ष व तैवान मुद्यामुळे या प्रक्रियेला अधिकच वेग आल्याचे दिसते. आर्थिक, व्यापारी तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर जात असल्याचे संकेत मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी मोहिमेनंतर चीनने रशियाच्या विरोधात भूमिका घेण्याचे नाकारले होतेपाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांनाही चीनने विरोध केला. त्याचवेळी पाश्चिमात्य देशांनी तैवानबाबत स्वीकारलेल्या धोरणावर रशियाने टीकास्त्र सोडले असून चीनला पाठिंबा दिला आहे.

महाशक्तींची भूमिका

या सर्व पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेली भेट तसेच चर्चा महत्त्वाची ठरते. पुढील काळात अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या आघाडीला आव्हान देण्यासाठी दोन्ही देश एकत्र येत असल्याचे स्पष्ट संकेत यावेळी दोन्ही नेत्यांनी दिले. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर एकध्रुवीय जगाची उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही वर्षात असा प्रयत्नांनी अत्यंत वाईट वळण घेतल्याचे दिसत आहे. ही बाब अस्वीकारार्ह आहे’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले. ‘जगात मोठ्या प्रमाणात सामाजिक अस्थैर्य असून अशा पार्श्वभूमीवर सकारात्मक ऊर्जा व स्थैर्य देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून चीन कार्यरत राहिल. जागतिक स्तरावर रशियासह महाशक्तीची भूमिका पार पाडण्यासाठी चीन प्रयत्न करेल’, असे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन संघर्ष तसेच तैवानच्या मुद्यावरही बोलणी झाली. युक्रेनच्या मुद्यावर चीनने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करून याबाबत चीनला असलेल्या चिंतांची रशियाला जाणीव असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी वन चायना पॉलिसीला रशियाचा संपूर्ण पाठिंबा असून त्यात बदल होणार नसल्याची ग्वाहीदेखील रशियन राष्ट्राध्यक्षांनी यावेळी दिली. दरम्यान, गुरुवारी पार पडलेल्या पुतिन-जिनपिंग भेटीवर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटली आहे.

‘रशियाबरोबर पूर्वीप्रमाणे सर्व व्यवहार चालू ठेवण्याची ही वेळ नाही. युक्रेन संघर्षावरून रशियावर टीका न करणारा चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडला आहे. युक्रेनच्या मुद्यावर चीनने बाजू निवडणे गरजेचे आहे’, असे अमेरिकेचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी बजावले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info