मॉस्को – रशियन जनता आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासह संस्कृती व परंपरा टिकविण्यासाठी संघर्ष करेल, असा विश्वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त केला. ‘रशियन स्टेटहूड’च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, पुतिन यांनी पुढील पिढ्यांमध्ये संस्कृती व परंपरा टिकून रहाव्यात तसेच या पिढ्यांना उज्ज्वल भविष्य असावे यासाठी लढा सुरू राहिल, असेही बजावले. काही तासांपूर्वीच रशियन राष्ट्राध्यक्षांनी पाश्चिमात्य देशांना अणुहल्ल्याची धमकी देऊन खळबळ उडविली होती. दरम्यान, रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी रशियन लष्कराने दक्षिण युक्रेनमधील युक्रेनी फौजांचे प्रतिहल्ले उधळून लावल्याचा दावा केला.
रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला असून दिवसेंदिवस हा संघर्ष अधिकाधिक प्रखर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शाब्दिक पातळीवरही आक्रमक वक्तव्यांची देवाणघेवाण सुरू असल्याचे गेल्या काही दिवसात समोर येत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेला मिळालेल्या यशावर बोलताना, युक्रेनी फौजा संपूर्ण युक्रेन पुन्हा ताब्यात घेतील असा इशारा दिला होता. त्याचवेळी रशियन सैन्यासमोर आता पाठ दाखवून पळण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय राहिला नसल्याचा टोलाही लगावला होता.
या पार्श्वभूमीवर, रशियन राष्ट्राध्यक्षांनी अणुहल्ले व अतिरिक्त तैनातीची घोषणा करून खळबळ उडवली होती. त्यापाठोपाठ रशियाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व संस्कृतीच्या रक्षणाचा उल्लेख करून पुतिन यांनी आपले समर्थक तसेच रशियन जनतेला आवाहन केल्याचे दिसत आहे. त्याचवेळी युक्रेनसह पाश्चिमात्य देशांना रशिया माघार घेणार नसल्याचे संकेत दिल्याचेही दिसत आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष संघर्षावरून आवाहन करीत असतानाच संरक्षणमंत्री शोईगू यांनी दक्षिण युक्रेनमध्ये रशियाला मिळालेल्या यशाची माहिती दिली.
दक्षिण युक्रेनमध्ये युक्रेनकडून सुरू असलेली प्रतिहल्ल्यांची मोहीम रशियाने निष्फळ ठरविल्याचे संरक्षणमंत्री शोईगू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या तीन आठवड्यांच्या अवधीत युक्रेनने सात हजार जवान गमावले आहेत. तसेच युक्रेनचे 200हून अधिक रणगाडे व 15 लढाऊ विमाने नष्ट केल्याचा दावाही रशियन संरक्षणमंत्र्यांनी केला. यावेळी रशियाने खार्किव्हमधील लष्करी तुकड्या डोन्बास क्षेत्रात तैनात केल्याचा पुनरुच्चारही केला. गेल्या काही दिवसात रशियाने डोन्बासमधील हल्ल्यांमध्ये वाढ केली असून बाखमत शहर ताब्यात घेण्यासाठी आगेकूच केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी, युक्रेनमध्ये नियंत्रण मिळविलेल्या भागातून रशिया माघार घेणार नसल्याचा इशारा दिला. डोन्बास क्षेत्र व इतर प्रांतांच्या सुरक्षेसाठी रशिया या क्षेत्रात अण्वस्त्रे तैनात करु शकतो, असेही मेदवेदेव्ह यांनी बजावले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |