वॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेन युद्धात रशियाने अण्वस्त्रांचा वापर केल्यास त्याला काय प्रत्युत्तर द्यायचे यासंदर्भात अमेरिकेची योजना तयार आहे. मात्र त्याबद्दल विस्ताराने सांगणार नाही. पण रशियाने अण्वस्त्रे वापरली तर त्याचे भयावह परिणाम रशियाला भोगावे लागतील’, असा खरमरीत इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला. ब्लिंकन यांच्याबरोबरच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनीही युक्रेनविरोधात अण्वस्त्रहल्ला झाल्यास रशियाला निर्णायक प्रत्युत्तर मिळेल, असे बजावले आहे.
गेल्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, अणुयुद्धाबाबत देण्यात येणारे इशारे पोकळ नसल्याचे बजावले होते. ‘पाश्चिमात्य देश रशियाला न्यूक्लिअर ब्लॅकमेलची धमकी देत आहेत. पण हा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो, हे त्यांनी लक्षात घेतलेले बरे. जर रशियाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान मिळाले तर देश व जनतेच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर करण्यात येईल. मी हवेत बोलत नाही, याची जाण पाश्चिमात्यांनी ठेवावी’, अशा शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चिमात्यांना वास्तवाची जाणीव करून दिली होती.
पुतिन यांच्या वक्तव्यावर पाश्चिमात्य देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ब्रिटनच्या मंत्र्यांनी रशियाची धमकी गांभीर्याने घ्यायला हवी, असे म्हटले होते. अमेरिकेने रशियाला संदेश पाठवून इशारा दिल्याचे दावे माध्यमांनी केले होते. मात्र आता अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उघडपणे रशियाला परिणामांना सामोरे जाण्यावरून इशारा दिला आहे. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला. ‘परिणाम काय असतील याबद्दल मी जास्त बोलणार नाही. पण अण्वस्त्रांचा वापर केल्यास त्या देशाला व त्याबरोबर इतर देशांनाही त्याचे जबरदस्त भयानक परिणाम भोगावे लागतात, याची जाणीव संबंधितांना आहे’, या शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संभाव्य परिणामांकडे रशियाचे लक्ष वेधले.
ब्लिंकन यांच्याबरोबरच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनीही रशियन अण्वस्त्रांवर अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. ‘रशियाने जर आपली मर्यादा ओलांडली त्यांच्यावर भयावह आपत्तीजनक परिणामांची वेळ ओढावेल. रशियाच्या अण्वस्त्रहल्ल्यांना अमेरिका निर्णायक प्रत्युत्तर देईल’, असे सुलिवन यांनी बजावले. सुलिवन यांचे वक्तव्य रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेनच्या प्रांतांमधील सार्वमत व अण्वस्त्रांची तैनाती यावरून दिलेल्या इशाऱ्यावरील प्रतिक्रिया असल्याचा दावा माध्यमांनी केला.
रशियाने युक्रेनमधील लुहान्स्क, डोनेत्स्क, खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतांतील बहुतांश भागावर नियंत्रण मिळविले आहे. या प्रांतांमध्ये सार्वमताची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती पूर्ण झाल्यावर रशिया या प्रांतांना आपल्यात सामील करून घेईल, असे सांगण्यात येते. त्यावर भूमिका स्पष्ट करताना परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, युक्रेनमध्ये नियंत्रण मिळविलेल्या प्रांतांना रशिया संपूर्ण सुरक्षा पुरवेल, अशी ग्वाही दिली होती. त्याचवेळी अण्वस्त्रांच्या तैनातीबाबत प्रश्न उपस्थित केला असता ही तैनातीदेखील नव्या प्रांतांना लागू होईल, असे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले होते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील मोहिमेला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्येच रशिया अण्वस्त्रांचा वापर करु शकतो, असे संकेत दिले होते. पुतिन यांनी रशियाच्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टवर राहण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर रशियाने ‘सरमात’ या अण्वस्त्राची नवी चाचणी घेऊन सज्जता दाखवून दिली होती. त्यानंतर आता सहा महिन्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिल्याबे खळबळ उडाली असून अणुयुद्धाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, अमेरिकेने युक्रेनला प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणा पुरविल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली. गेल्या महिन्यात अमेरिकेने यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर ‘नॅशनल ॲडव्हान्स्ड् सरफेस टू एअर मिसाईल सिस्टिम्स’ युक्रेनमध्ये कार्यरत झाल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |