राष्ट्राध्यक्ष बायडेन ‘स्पेस फोर्स’मध्ये बदल करणार नाही – अमेरिकी अधिकारी व विश्‍लेषकांचे संकेत

राष्ट्राध्यक्ष बायडेन ‘स्पेस फोर्स’मध्ये बदल करणार नाही – अमेरिकी अधिकारी व विश्‍लेषकांचे संकेत

वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अवघ्या चोवीस तासात ज्यो बायडेन यांनी १७ अध्यादेश जारी केले होते. तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय मागे फिरविणार्‍या नऊ अध्यादेशांचा यात समावेश होता. यापुढेही राष्ट्राध्यक्ष बायडेन ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात अध्यादेश काढू शकतात. पण ‘स्पेस फोर्स कमांड’च्या स्थापनेबाबत घेतलेल्या निर्णयात राष्ट्राध्यक्ष बायडेन कुठलाही बदल करणार नाहीत, असे संकेत बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व विश्‍लेषक देत आहेत.

शपथविधीनंतर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तातडीने सर्व सूत्रे हाती घेऊन १७ अध्यादेशांवर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. यामध्ये मेक्सिको सीमेवरील बॉर्डर वॉलचे बांधकाम रोखणे, सात देशांच्या नागरिकांवरील अमेरिकेतील प्रवेशबंदी मागे घेणे, निर्वासितांविरोधातील व्यापक कारवाई रोखणे, पॅरिस हवामान करारात सहभागी होणे, या अध्यादेशांचा समावेश होता. या व्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ‘एच१बी’ व्हिसा, अफगाणिस्तानातील सैन्यमाघार आणि इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्याचे स्पष्ट संकेत दिले. येत्या काळात बायडेन प्रशासन गेल्या चार वर्षातील काही महत्त्वाचे निर्णय, कायदे मागे घेऊ शकतात, असा दावा केला जातो.

पण ट्रम्प यांनी उभारलेल्या ‘स्पेस फोर्स’बाबतचा निर्णय राष्ट्राध्यक्ष बायडेन मागे घेणार नाहीत, असा दावा केला जातो. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जाहीरपणे याविषयी बोलण्याचे टाळले आहे. तसेच व्हाईट हाऊसने देखील याप्रकरणी बायडेन यांची भूमिका मांडण्यास नकार दिला. अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लाईड ऑस्टिन यांनी अंतराळ क्षेत्राला फार मोठे महत्त्व असल्याचे म्हटले आहे.

गेल्या कित्येक वर्षांच्या या स्पेस फोर्सची स्थापना झाल्याचेही संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी अधोरेखित केले होते. तर रशिया व चीन अंतराळात संरक्षणसामर्थ्य वाढवून त्याचा अमेरिकेच्या विरोधात वापर करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप अमेरिकेचे उपसंरक्षणदल प्रमुख जनरल जॉन हॅटन यांनी गेल्याच आठवड्यात केला होता. त्यामुळे अमेरिकेचे लष्करी अधिकारी या ‘स्पेस फोर्स’च्या बाजूने असल्याचे दिसत आहे.

२०१९ साली तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण कमांडमधील सर्वात महत्त्वाचे आठवे कमांड सेंटर म्हणून ‘स्पेस फोर्स’ची घोषणा केली होती. चीन आणि रशियापासून अंतराळातील अमेरिकेच्या हितसंबंधांना वाढणारा धोका अधोरेखित करून ट्रम्प यांनी स्पेस फोर्सची स्थापना केली. यासाठी चीन आणि रशियाने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्रांचा दाखला ट्रम्प यांनी त्यावेळी दिला होता. तसेच या ‘स्पेस फोर्स’अंतर्गत ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वी ‘स्पेस गार्डियन्स’च्या तैनातीची घोषणा केली होती. ट्रम्प यांच्या या स्पेस फोर्स कमांडला अमेरिकन काँग्रेसमधील दोन्ही पक्षांचे समर्थन मिळाले होते. त्यामुळे बायडेन प्रशासनाला ‘स्पेस फोर्स’चा निर्णय मागे घेण्यासाठी लष्करी अधिकार्‍यांबरोबरच अमेरिकन काँग्रेस आणि सिनेटमधील विरोधाचाही सामना करावा लागेल, याची जाणीव अमेरिकेचे अधिकारी व विश्‍लेषक करून देत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info