सेऊल – शत्रू देशाकडून उत्तर कोरियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाच तर तितक्याच ताकदीने त्यांना उत्तर दिले जाईल. अण्वस्त्रांचा सामना अण्वस्त्रांनी केला जाईल. अमेरिका व मित्रदेश उत्तर कोरियाला चिथावणी देऊन आत्मघात करून घेतील’, अशी धमकी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी दिली. शुक्रवारी उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. उत्तर कोरियाच्या हुकूमशहांच्या उपस्थितीत अमेरिकेपर्यंत मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पडल्याचा दावा उत्तर कोरियन माध्यमे करीत आहेत.
सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाने आपल्या लष्करी धोरणात मोठा बदल केला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तर कोरियाने शत्रू देशाविरोधात ‘नो फर्स्ट यूज’ अर्थात पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर केला जाणार नाही, अशी भूमिका स्वीकारली होती. पण सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाने हुकूमशहा किम जाँग-उन यांच्या सुरक्षेला प्राथमिका देऊन अण्वस्त्रांच्या वापराबाबतचे धोरण बदलले. शत्रू देशाने हुकूमशहा किम जाँग-उन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला तर त्या देशावर थेट अण्वस्त्राचा वापर करण्याची घोषणा करून उत्तर कोरियाने आपल्या गेल्या कित्येक वर्षांच्या धोरणात बदल केला होता.
त्यानंतर उत्तर कोरियाने दोन वेळा अमेरिकेला अण्वस्त्रांची धमकी दिली आहे. शनिवारी उत्तर कोरियाच्या मुखपत्राने किम जाँग-उन यांचा हवाला देऊन अमेरिका व मित्रदेशांना धमकावले. शुक्रवारी उत्तर कोरियाने ‘हासाँग-१७’ या नव्या प्रकारच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे जाहीर केले. अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील शहरांपर्यंत मारा करू शकणाऱ्या या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीद्वारे उत्तर कोरियाने आपण अमेरिकेपेक्षाही सरस असल्याचे दाखवून दिले आहे, असा दावा सदर वृत्तसंस्थेने केला. हुकूमशहा किम जाँग-उन यांनी पत्नी व मुलीसह शुक्रवारच्या या यशस्वी चाचणीची पाहणी केल्याचे सांगून उत्तर कोरियन वृत्तसंस्थेने त्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. ‘कोणत्याही अण्वस्त्रांच्या चिथावणीला उत्तर देण्याची सज्जता आपल्याकडे आहे, हे उत्तर कोरियाने या चाचणीद्वारे दाखवून दिली, हा संदेश देण्यासाठी मी येथे आलो आहे’, असे किम जाँग-उन यांनी या चाचणीनंतर जाहीर केले. त्याचबरोबर अमेरिकेच्या उत्तर कोरियाविरोधी आक्रमकतेला अण्वस्त्रांनी उत्तर मिळेल, असा इशारा किम जाँग-उन यांनी दिला. उत्तर कोरियाकडे किमान ४० अण्वस्त्रे असल्याचा दावा केला जातो.
दरम्यान, उत्तर कोरिया अणुचाचणीच्या अगदी जवळ पोहोचल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. या अणुचाचणीपासून जगाचे लक्ष भरकटविण्यासाठी उत्तर कोरिया बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेत असल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. याआधी उत्तर कोरियाने २००६ ते २०१७ या कालावधीत एकूण सहा अणुचाचण्या घेतल्या आहेत. पाच वर्षानंतर उत्तर कोरिया घेत असलेली ही अणुचाचणी सर्वाधिक शक्तीशाली असेल, अशी चिंता अमेरिका व दक्षिण कोरियातील विश्लेषकांनी व्यक्त केली होती.