मॉस्को – रशिया ही आर्क्टिक क्षेत्रातील सामर्थ्यशाली व प्रभावी सत्ता असून स्वदेशी बनावटीच्या ‘न्यूक्लिअर आईसब्रेकर्स’ त्याला दुजोरा देणाऱ्या ठरतात, या शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दोन महाकाय जहाजे ‘आर्क्टिक फ्लीट’चा भाग बनल्याचे जाहीर केले. मंगळवारी झालेल्या सोहळ्यात ‘उरल’ व ‘याकुतिआ’ ही दोन ‘न्यूक्लिअर आईसब्रेकर्स’ सामील करून रशियाने आपली ताकद दाखवून दिल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षात रशियाने आर्क्टिक क्षेत्रातील आपला प्रभाव वाढविण्यावर भर दिला आहे. याअंतर्गत आर्क्टिकमधून व्यापारी मार्ग विकसित करण्याबरोबरच इंधनप्रकल्पांमधील गुंतवणूक तसेच संरक्षणतळांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे.
‘आर्क्टिक क्षेत्रातील संशोधन व या क्षेत्राचा भाग असणाऱ्या नॉर्दर्न रिजन्सचा विकास रशियाच्या सुरक्षित भविष्यासाठी महत्त्वाचे ठरते. हवामानात होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात व्यापार व वाहतुकीचा मार्ग विकसित होणे रशियासाठी आवश्यक बाब ठरते. नजिकच्या काळात हे क्षेत्र निर्णायक ठरु शकते. नॉर्दर्न सी रुटच्या क्षमता वाढविण्यासाठी नव्या आईसब्रेकर जहाजांच्या उभारणीसंदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत उपयुक्त ठरला आहे’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नव्या आईसब्रेकर्समागील भूमिका स्पष्ट केली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या दशकापासून आर्क्टिक क्षेत्रातील रशियन क्षमता वाढविण्यावर भर दिला होता. याअंतर्गत नवे इंधनप्रकल्प, व्यापारी मार्ग व संरक्षणतळ विकसित करण्यात येत आहेत. ‘न्यूक्लिअर आईसब्रेकर्स’चा ताफाही त्याचाच भाग आहे. रशियाने सहा नव्या न्यूक्लिअर आईसब्रेकर्स तयार करण्याची घोषणा केली होती. त्यातील ‘आर्क्टिका’ व ‘सिबिर’ ही जहाजे आधीच कार्यरत झाली आहेत. मंगळवारी ‘उरल’ व ‘याकुतिआ’च्या समावेशाने रशियन ताफ्यातील आईसब्रेकर्सची संख्या चारवर गेली आहे. ‘चुकोट्का’ २०२६ साली तयार होणार असून ‘रोसिया’ची उभारणी २०२७ सालापर्यंत पूर्ण झालेली असेल, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या तंत्रज्ञान तसेच जहाजबांधणी उद्योगांसह अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध असतानाही रशियाने दोन ‘न्यूक्लिअर आईसब्रेकर्स’ उभारून आपली ताकद दाखवून दिल्याचे दिसत आहे. त्याचवेळी आर्क्टिक रशियाच्या भविष्याच्या दृष्टिने महत्वाचा असल्याचे सांगत रशियन अर्थव्यवस्था नव्या पर्यायांसाठी सज्ज होत असल्याचे संकेतही दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |