आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा ‘व्हेरिअंट’ सर्वात घातक ठरण्याचा इशारा

‘डब्ल्यूएचओ’कडून तातडीची बैठक

बोटस्वाना/लंडन – आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका तसेच बोटस्वाना या देशांमध्ये कोरोनाचा नवा ‘व्हेरिअंट’ समोर आला आहे. हा व्हेरिअंट यापूर्वी सर्वात वेगाने पसरणार्‍या ‘डेल्टा’ व ‘बेटा’ या प्रकारांपेक्षाही अधिक घातक असून आतापर्यंत सुमारे १०० हून अधिक रुग्णांना त्याची लागण झाली आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकारात ५०हून अधिक ‘म्युटेशन्स’ झाल्याचे उघड झाले आहे.

नवा ‘व्हेरिअंट’

आफ्रिकेव्यतिरिक्त इस्रायल तसेच हॉंगकॉंगमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत. नवा व्हेरिअंट समोर आल्यावर जगभरातील शास्त्रज्ञांनी इशारे देण्यास सुरुवात केली असून ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी तातडीची बैठक आयोजित केली आहे.

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये नवा व्हेरिअंट निदर्शनास आला आहे. एकट्या दक्षिण आफ्रिकेत याचे १००हून अधिक रुग्ण आढळले असून शेजारी देश बोटस्वानामध्ये चार रुग्ण सापडले आहेत. यात लसीकरण झालेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. या दोन देशांव्यतिरिक्त इस्रायल व हॉंगकॉंगमध्येही नव्या व्हेरिअंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या व्हेरिअंटचा उल्लेख सध्या ‘बी.१.१.५२९’ असा करण्यात येत आहे.

नवा ‘व्हेरिअंट’

दक्षिण आफ्रिकेतील संशोधक व आरोग्यतज्ज्ञांनी नव्या व्हेरिअंटबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमध्ये मोठ्या प्रमाणात ‘म्युटेशन्स’ आढळली असून यापूर्वीच्या कोणत्याही प्रकारात इतके बदल झालेले दिसून आले नव्हते, असे प्राध्यापक तुलिओ डे ऑलिव्हेरा यांनी सांगितले. आतापर्यंतच्या अभ्यासत नव्या व्हेरिअंटमध्ये ५० हून अधिक ‘म्युटेशन्स’ आढळली असून त्यातील ३० विषाणूमधील ‘स्पाईक प्रोटिन’ या घटकात घडून आल्याचे ऑलिव्हेरा म्हणाले. ‘स्पाईक प्रोटिन’ची रचना लस विकसित करण्यासाठी निर्णायक ठरत असल्याने यात झालेले मोठे बदल संशोधकांसाठी आव्हान ठरु शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.

नवा ‘व्हेरिअंट’

काही ब्रिटीश संशोधकांनी नवा व्हेरिअंट ‘एडस्’च्या रुग्णाला झालेल्या कोरोना संसर्गातून विकसित झाल्याचा दावा केला आहे. मात्र याला अद्याप उघड दुजोरा मिळालेला नाही. नवा ‘बी.१.१.५२९’ व्हेरिअंट लसीची प्रभावक्षमता ४० टक्क्यांनी कमी करु शकतो, असे संशोधकांनी बजावले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ने शुक्रवारी तातडीची बैठक आयोजित केली आहे. जगभरातील विविध देशांनी परदेशी प्रवासावर निर्बंध लावण्याचेही संकेत दिले आहेत. सध्या कोरोनाच्या लाटेचे केंद्र असलेल्या युरोपने काही आफ्रिकी देशांच्या विमानप्रवासावर निर्बंध लादण्याची तयारी सुरू केली आहे. ब्रिटननेही यासंदर्भात हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नव्या व्हेरिअंटचा शोध व युरोपातील कोरोनाची भयावह स्थिती या पार्श्‍वभूमीवर जगभरातील शेअरबाजारांमध्ये जोरदार घसरण सुरू झाली आहे. अमेरिकेसह युरोप तसेच आशियाई देशांमधील शेअर निर्देशांकांना मोठे धक्के बसले आहेत. अमेरिकेतील शेअर निर्देशांक दोन टक्क्यांनी तर युरोपमधील दोन ते साडेतीन टक्क्यांनी घसरले आहेत. आशियातील चीन, जपान, भारतमधील शेअरबाजारांनाही फटका बसला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info