रशिया-युक्रेन संघर्षात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून ‘न्यूक्लिअर कॅपेबल मॉर्टर वेपन’ तैनात करण्याचे संकेत

मॉस्को – रशिया-युक्रेन संघर्ष दिवसेंदिवस अधिक प्रखर होत असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्याची तीव्रता अधिक वाढविण्याचे संकेत दिले आहेत. युक्रेनमध्ये ‘2एस4 ट्युलिप’ ही जगातील सर्वात मोठी व अत्याधुनिक मॉर्टर यंत्रणा तैनात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘240 एमएम सेल्फ प्रॉपेल्ड हेवी मॉर्टर’ प्रकारातील या यंत्रणेकडून ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर बॉम्ब्स’चा मारा करणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी अफगाणिस्तान, सिरिया व चेचेन्यामध्ये याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मॉर्टर

गेल्या काही दिवसांमध्ये पूर्व युक्रेनमधील लढाई अधिकाधिक तीव्र व भयावह होत चालल्याच्या बातम्या समोर येत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, पूर्व युक्रेनमधील आघाडी सर्वाधिक रक्तरंजित आघाडी असल्याचे म्हटले होते. बाखमत व सोलेदारसह आजूबाजूच्या परिसरात प्रेतांचा खच पडल्याचा दावाही राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला होता. रशियाकडून सोलेदार शहराच्या बहुतांश भागावर नियंत्रण मिळविण्यात आल्याची माहिती ब्रिटन तसेच अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.

रशियातील कंत्राटी लष्करी कंपनी असणाऱ्या ‘वॅग्नर ग्रुप’ने सोलेदारमधील काही फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र युक्रेन अद्यापही त्याची कबुली देण्यास तयार नाही. दुसऱ्या बाजूला रशियातील काही तळांवर तसेच लष्करी तुकड्यांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर पुतिन यांना समर्थन देणाऱ्या गटात अस्वस्थता असल्याच्या बातम्या रशियन माध्यमे व सोशल मीडियातून समोर येत आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात पुतिन युक्रेनमधील लढाई अधिक प्रखर करण्यासाठी मोठी पावले उचलतील, असेही सांगण्यात येते.

याच पार्श्वभूमीवर, ‘2एस4 ट्युलिप’च्या तैनातीसंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. रशियाने यापूर्वी मारिपोलमध्ये याचा वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. या यंत्रणेद्वारे मॉर्टर्सबरोबरच ‘क्लस्टर ॲम्युनिशन’ तसेच ‘मायक्रो न्यूक्स’चाही मारा करता येतो, असे सांगण्यात येते. याचा पल्ला सुमारे 12 मैलांचा असून फुटबॉल मैदानाच्या आकाराचा भाग असणारा तळ अथवा मोठा शस्त्रसाठा नष्ट करण्याची क्षमता असल्याचे पाश्चिमात्य माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

रशियाची ही नवी तैनाती युक्रेनमध्ये ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’च्या हल्ल्यांचे संकेत देणारी आहे, असा दावा विश्लेषकांनी केला आहे. रशिया-युक्रेन संघर्षाला सुरुवात झाल्यापासून राष्ट्राध्यक्ष पुतिन व इतर आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने अणुयुद्धाचे इशारे दिले होते. काही आठवड्यांपूर्वी रशियाने नवी अण्वस्त्रे तैनात करीत असल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले होते. रशियन लष्करी अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत अण्वस्त्रांच्या वापराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, असे वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले होते.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info