वॉशिंग्टन/किव्ह – ‘युक्रेनने क्रिमिआ परत मिळवायचा प्रयत्न केल्यास ही बाब रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासाठी रेड लाईन ठरेल. प्रत्युत्तर म्हणून रशिया अधिक व्यापक व आक्रमक स्वरुपाचे हल्ले करु शकतो’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला. बुधवारी एका खाजगी बैठकीदरम्यान ब्लिंकन यांनी हा इशारा दिल्याचे समोर आले आहे. ब्लिंकन इशारा देत असतानाच परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व्हिक्टोरिआ न्यूलँड यांनी, क्रिमिआवरील युक्रेनच्या हल्ल्यांना अमेरिका विरोध करणार नाही, असे वक्तव्य केले आहे.
गेल्या महिन्यात युरोपच्या डॅव्होसमध्ये झालेल्या बैठकीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी क्रिमिआ पुन्हा ताब्यात घेण्याचा इरादा जाहीर केला होता. ‘क्रिमिआ हा युक्रेनचाच भूभाग आहे. पाश्चिमात्य देशांनी आम्हाला शस्त्रास्त्रे पुरवावीत व आम्ही आमचा क्रिमिआ परत मिळवून दाखवू’, असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की क्रिमिआ हा युक्रेनचाच भाग असून तो ताब्यात घेतल्यावरच युक्रेनचे जवान आपली मोहीम थांबवतील, असे सातत्याने बजावत आहेत.
युक्रेनी राष्ट्राध्यक्षांच्या डॅव्होसमधील वक्तव्यानंतर अमेरिकेतील आघाडीचे दैनिक असणाऱ्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने क्रिमिआवर हल्ले चढविण्यासाठी अमेरिका युक्रेनला अतिरिक्त शस्त्रपुरवठा व इतर प्रकारचे सहाय्य करू शकतो, असा दावा केला होता. बायडेन प्रशासनात क्रिमिआवरील हल्ल्यासाठी युक्रेनला सहाय्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे अमेरिकी दैनिकाने म्हटले होतेे. त्यासाठी युक्रेनला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे व रॉकेट्सही पुरविण्यात येतील, असे संकेतही अमेरिकी सूत्रांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री ब्लिंकन व न्यूलँड यांची परस्परविरोधी वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरतात.
अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाकडून युक्रेनबाबत करण्यात येणारी वक्तव्ये या देशाचा युक्रेन संघर्षातील थेट सहभाग दाखवून देणारी ठरतात, असा ठपका अमेरिकेतील रशियन दूतावासाने ठेवला आहे. तर क्रिमिआ हा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी संवेदनशील मुद्दा असल्याकडे रशियन विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे या प्रांतावर हल्ला झाल्यास रशिया सर्वसामर्थ्यानिशी युक्रेनवर तुटून पडेल, असे मानले जाते.
एकेकाळी रशियन संघराज्याचा भाग असलेला क्रिमिआ हा प्रांत १९५४ साली युक्रेनला हस्तांतरित करण्यात आला होता. त्यानंतर २०१४ साली रशियाने हल्ला चढवून पुन्हा एकदा क्रिमिआवर ताबा मिळविला होता. आंतरराष्ट्रीय समुदायाने मात्र रशियाचा हा ताबा मान्य करण्यास नकार दिला आहे. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व इतर आघाडीच्या नेत्यांनी क्रिमिआ हा आता मुद्दाच राहिलेला नाही, असे सांगून युक्रेनसह पाश्चिमात्य देशांची वक्तव्ये फेटाळली आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |