परदेशी आक्रमकांचा धोका बळावल्याने उत्तर कोरियाच्या चीनबरोबरील सहकार्याचे महत्त्व वाढले – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन

परदेशी आक्रमकांचा धोका

प्योनग्यँग/बीजिंग – परदेशी आक्रमक शक्तींकडून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरिया व चीनमधील सहकार्य महत्त्वाचे ठरते, असा दावा उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांनी केला आहे. दोन देशांमधील मैत्री व सहकार्य कराराला सहा दशके पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने चीनला पाठविलेल्या संदेशात किम जाँग उन यांनी हे वक्तव्य केल्याचे कोरियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही दोन देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेण्याचे आश्‍वासन दिल्याचा दावा उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने केला आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाच्या हुकुमशहांनी अमेरिकेला अणुहल्ल्याची धमकी दिली होती. तसेच संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आदेश आपल्या अधिकार्‍यांना दिले होते. अमेरिकेत बायडेन प्रशासन सत्तेवर आल्यानंतर उत्तर कोरियाने आपल्या लष्करी तसेच आण्विक हालचाली वाढविल्याचेही समोर आले आहे. मार्च महिन्यात उत्तर कोरियाने तीन क्षेपणास्त्र चाचण्याही केल्या होत्या. उत्तर कोरियाच्या आण्विक प्रकल्पात नव्या हालचाली सुरू झाल्याचा अहवालही आंतरराष्ट्रीय अभ्यासगटांनी दिला होता.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/growing-threat-of-foreign-aggression-has-increased-the-importance-of-north-korea-cooperation-with-china/