अण्वस्त्रांच्या वापराची रशिया देत असलेली धमकी पोकळ नाही

- रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – ‘पाश्चिमात्य देश रशियाला न्यूक्लिअर ब्लॅकमेलची धमकी देत आहेत. पण हा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो, हे त्यांनी लक्षात घेतलेले बरे. जर रशियाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान मिळाले तर देश व जनतेच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर करण्यात येईल. मी हवेत बोलत नाही, याची जाण पाश्चिमात्यांनी ठेवावी’, अशा शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चिमात्यांना वास्तवाची जाणीव करून दिली.

रशियाचे लष्कर एक हजार किलोमीटर्सहून अधिक लांबी असणाऱ्या आघाडीवर लढत आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्य फक्त युक्रेनच्या सैन्याविरोधात नाही तर पाश्चिमात्य देशांच्या संपूर्ण लष्करी यंत्रणेविरोधात संघर्ष करते आहे. पाश्चिमात्यांनी रशियाचे विभाजन करून देश नष्ट करण्याची योजना आखली आहे. रशियाच्या दक्षिण भागांमध्ये नाटोकडून टेहळणी सुरू आहे. रशियात लष्करी संघर्ष सुरू करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन व युरोपिय महासंघ युक्रेनला भाग पाडत आहेत. कोणत्याही मार्गाने रशियाचा युद्धात पराभव व्हायलाच हवा, अशी आक्रमक भूमिका पाश्चिमात्य देशांकडून सातत्याने घेतली जात आहे’, असे सांगून पुतिन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

झॅपोरिझिआ अणुप्रकल्पावरील हल्ले व नाटो सदस्य देशांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांच्या माध्यमातून रशियाला न्यूक्लिअर ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न झाले. रशियाविरोधात अण्वस्त्रे वापरण्याचे इशारे देण्यात आले. या देशांनी रशियाकडे नाटो देशांपेक्षाही प्रगत अण्वस्त्रे असल्याचे लक्षात ठेवावे, असे पुतिन यांनी बजावले. रशिया आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वाप रकरून रशियन जनतेचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व टिकवेल, याची नागरिकांनी खात्री बाळगावी अशी ग्वाहीदेखील रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिली. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, पुतिन यांना अण्वस्त्रांच्या वापरावरून इशारा दिला होता. रशियाने कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रांचा वापर करु नये,.अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले होते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील मोहिमेला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्येच रशिया अण्वस्त्रांचा वापर करु शकतो, असे संकेत दिले होते. पुतिन यांनी रशियाच्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्टवर राहण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर रशियाने ‘सरमात’ या अण्वस्त्राची नवी चाचणी घेऊन सज्जता दाखवून दिली होती. त्यानंतर आता सहा महिन्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी देऊन युक्रेनसह पाश्चिमात्य देशांना इशारा दिला आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या नव्या इशाऱ्याने पाश्चिमात्य जगतात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून अणुयुद्धाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

युक्रेनमधील मोहिमेसाठी तीन लाख अतिरिक्त जवानांची तैनाती होणार

मॉस्को – काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला अधिक आक्रमक व जबर प्रत्युत्तराचा इशारा दिला होता. हा इशारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पुतिन यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मातृभूमीला असणाऱ्या धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनमध्ये तीन लाख अतिरिक्त जवान तैनात करण्यात येतील, अशी घोषणा रशियन राष्ट्राध्यक्षांनी केली. सध्या राखीव दलांचा भाग असणाऱ्या व यापूर्वी लष्करात कार्यरत असलेल्यांचा यात समावेश असेल. रशियाच्या संरक्षण विभागाला यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत, असे पुतिन यांनी जाहीर केले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच रशियाने अशा प्रकारे राखीव दलांमधून अतिरिक्त तैनाती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी बुधवारपासून अतिरिक्त तैनातीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली. रशियातील जवळपास अडीच कोटी नागरिकांना लष्करी भरतीच्या प्रक्रियेत सामील केले जाऊ शकते, असा दावाही शोईगू यांनी यावेळी केला. रशियाच्या या नव्या तैनातीमुळे पुढील काळात युक्रेनमधील संघर्ष अधिक प्रखर होण्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सध्या रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनमधील प्रांतांनी सार्वमताचा निर्णय घेतल्याचेही जाहीर केले. डोन्बास क्षेत्रातील लुहान्स्क व डोनेत्स्क तसेच खेर्सन आणि झॅपोरिझिआ प्रांतांनी त्यांच्या भविष्यासाठी सार्वमत घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी रशियाला सहाय्याचे आवाहन केले आहे. रशिया त्यांना सहाय्य करील व त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देईल, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले. यापूर्वी 2014 साली क्रिमिआवर ताबा मिळविल्यानंतर रशियाने या प्रांतात सार्वमत घेऊन तो रशियाला जोडण्याचा निर्णय घेतला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info