युक्रेनच्या ड्रोनहल्ल्यांनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून ‘अलर्ट’चे आदेश

मॉस्को/किव्ह – युक्रेनकडून रशियाच्या हद्दीत झालेल्या ड्रोन हल्ल्यांची राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गंभीर दखल घेतली आहे. एकापाठोपाठ झालेल्या तीन ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गुप्तचर यंत्रणांसह संरक्षणदले व इतर सुरक्षा विभागांची बैठक घेऊन ‘अलर्ट’चे आदेश दिले आहेत. रशिया युक्रेन सीमेवर अतिरिक्त तैनातीचे संकेतही देण्यात आल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली. युक्रेनकडून एकापाठोपाठ झालेले ड्रोन हल्ले रशियासाठी इशारा असल्याचा दावा काही विश्लेषकांनी केला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये रशियन संरक्षणदलांनी युक्रेनमधील आघाडीवर हल्ल्याची धार अधिक प्रखर केल्याचे समोर आले होते. डोन्बास क्षेत्रासह खार्किव्ह, खेर्सन व झॅपोरिझिआत रशियन फौजांकडून जबरदस्त मारा सुरू होता. रशियाच्या या हल्ल्यांना प्रतिकार करणे युक्रेनी लष्करासाठी अवघड जात असल्याची कबुली वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांकडून देण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर रशियावरील प्रतिहल्ल्यांसाठी युक्रेनी फौजांनी ड्रोन्सचा वापर वाढविल्याचे सांगण्यात येते.

‘अलर्ट’चे आदेश

सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस युक्रेनने रशियाच्या विविध भागांमध्ये ड्रोन हल्ले चढविले. सोमवारी युक्रेन सीमेनजिक असणाऱ्या बेलगोरोद प्रांतात तीन ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बेलगोरोद शहरातील काही इमारती व गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारी युक्रेनने राजधानी मॉस्कोनजिक असलेल्या इंधनप्रकल्पाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मॉस्कोपासून अवघ्या ६० मैलांवर असलेल्या गुबास्तोव्होमधील गाझप्रोम कंपनीच्या प्रकल्पावर ड्रोन्स धाडण्यात आले. कंपनीच्या बाह्य सुरक्षा कुंपणानजिकच्या भागात ड्रोन पाडण्यात आल्याची माहिती स्थानिक गव्हर्नरनी दिली.

‘अलर्ट’चे आदेश

मंगळवारी ब्रिआंस्क प्रांतातही ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र ड्रोन पाडण्यात रशियन फौजांना यश मिळाल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली. त्यापाठोपाठ बुधवारी रशियाच्या क्रिमिआ प्रांतात तब्बल १० ड्रोन्सच्या सहाय्याने मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. यातील सहा ड्रोन्स उद्ध्वस्त करण्यात आले तर चार ड्रोन्स इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमच्या सहाय्याने निकामी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

‘अलर्ट’चे आदेश

एकापाठोपाठ झालेल्या या हल्ल्यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी राजधानी मॉस्कोनजिक झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर पुतिन यांनी महत्त्वाच्या यंत्रणांची बैठक घेतल्याचे सांगण्यात येते. या बैठकीत रशिया-युक्रेन सीमेवरील सुरक्षा अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमेवरील तैनाती अधिक वाढविण्यात येणार असून अतिरिक्त हवाईसुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येतील, असा दावा रशियन माध्यमांनी केला.

यापूर्वी डिसेंबर महिन्यातही युक्रेनने रशियन तळांवर ड्रोन हल्ले चढविले होते. यात रशियाच्या संरक्षण तळांचे तसेच लढाऊ विमानांचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. या हल्ल्यानंतर रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले केले होते.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info