बायडेन प्रशासन जगाला अणुयुद्धाकडे ढकलत आहे

- अमेरिकेच्या माजी संसद सदस्य तुलसी गबार्ड यांचा आरोप

वॉशिंग्टन/मॉस्को – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे प्रशासन रशियाविरोधात छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) छेडून जगाला अणुयुद्धाच्या दिशेने ढकलत आहे, असा गंभीर आरोप अमेरिकेच्या माजी संसद सदस्य तुलसी गबार्ड यांनी केला. बायडेन प्रशासन व त्यातील नेत्यांनी आपल्याला कोणत्या स्थितीत नेऊन ठेवले आहे याचा अमेरिकी जनतेने गांभीर्याने विचार करायला हवा, असे आवाहनही गबार्ड यांनी केले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी युक्रेनचा मुद्दा पुढे करून अमेरिकेलाच रशियाबरोबर युद्ध पुकारायचे आहे, असा ठपकाही ठेवला होता.

ढकलत आहे तुलसी गबार्ड

‘फॉक्स न्यूज’ या अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गबार्ड यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या धोरणावर घणाघाती टीका केली. ‘रशिया-युक्रेन युद्धाची अखेर कधी व कशी होणार हे आपल्यालाच माहिती नसल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन स्वतःच सांगत आहेत. पण आम्हाला हे युद्ध कुठपर्यंत जाईल ते ठाऊक आहे. हे युद्ध आपल्यला रशियाबरोबरील अणुयुद्धाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाणार आहे. अमेरिकेचे नेतृत्व याबाबतीत अत्यंत निष्काळजी भूमिका घेत आहे. रशियाविरोधात होणाऱ्या मोठ्या युद्धाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे’, या शब्दात गबार्ड यांनी बायडेन यांना लक्ष्य केले.

ढकलत आहे तुलसी गबार्ड

‘रशियाविरोधात थेट युद्ध होणे म्हणजे काहीच नाही, अशा थाटात अमेरिकी नेते वावरत आहेत. भूमिगत खंदकात राहून आपण कसे युद्ध लढू शकतो, याच्या योजना बनविण्यात येत आहेत. याच गोष्टी बायडेन प्रशासनाच्या गांभीर्यावर शंका उपस्थित करणाऱ्या आहेत. आपण किती मोठ्या धोक्याला तोंड देत आहोत याचा विचार न करता बायडेन व त्यांचे प्रशासनातील सहकारी बेफिकिरपणे युद्ध पुढे कसे चालेल याचे नियोजन करीत आहेत. ही बाब अत्यंत विचित्र तसेच अस्वस्थ करणारी आहे’, असे माजी संसद सदस्या गबार्ड यांनी बजावले. अणुयुद्ध झाले तर त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या राष्ट्राध्यक्ष बायडेन, संसद सदस्य, आपल्या देशातील नेते तसेच धनाढ्यांकडे सुरक्षित राहण्यासाठी जागा उपलब्ध आहे. पण अमेरिका व रशियातील आपल्यासारखे सामान्य नागरिक अणुयुद्धात नाहीसे होतील, याची जाणीव गबार्ड यांनी यावेळी करून दिली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा सध्याचा आखात दौरा म्हणजे ‘फार्स’ असल्याचा टोलाही तुलसी गबार्ड यांनी मुलाखतीत लगावला.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या आधीपासून गबार्ड यांनी बायडेन यांच्या धोरणावर जोरदार कोरडे ओढण्यास सुरुवात केली होती. ‘रशियाबरोबर नवा संघर्ष सुरू झाला, की त्याचा फार मोठा लाभ अमेरिकेत सर्वात प्रभावशाली असलेल्या शस्त्रास्त्रांच्या व्यापाराला होईल. यात हितसंबंध गुंतलेली मंडळी बायडेन प्रशासनावर नियंत्रण ठेवून आहेत’, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर युक्रेनमधील अमेरिकेच्या जैविक प्रयोगशाळांमागील वास्तव खुले करावे, अशी मागणीही गबार्ड यांनी केली होती.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info