मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या बाखमतसंदर्भातील धोरणावरून पाश्चिमात्य देशांमध्ये नाराजीचे सूर उमटत असतानाच रशियाने पूर्व तसेच दक्षिण युक्रेनवर अधिक प्रखर मारा सुरू केला आहे. गेल्या २४ तासांमध्ये रशियन फौजांनी बाखमतसह डोनेत्स्क, स्लोव्हिआन्स्क, झॅपोरिझिआ भागाला हवाईहल्ल्यांसह क्षेपणास्त्रे तसेच रॉकेट्सच्या सहाय्याने लक्ष्य केले. तर गेल्या ४८ तासांमध्ये युक्रेनच्या विविध भागात झालेल्या संघर्षात ६००हून अधिक युक्रेनियन जवान ठार झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला वर्ष पूर्ण होत असताना अनेक पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमांनी रशियाच्या संरक्षणक्षमतेत घट झाल्याचे तसेच रशिया कमकुवत झाल्याचे दावे केले होते. मात्र प्रत्यक्षात रशियन फौजा अधिक आक्रमकतेने व अधिक सामर्थ्यासह युक्रेनवर हल्ले चढवित असल्याचे समोर येत आहे. उत्तरेतील खार्किव्ह प्रांतापासून दक्षिणेकडील ओडेसा शहरापर्यंतच्या विविध भागांमध्ये रशियाकडून सातत्याने मारा करण्यात येत आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांची संख्या घटली असली तरी सध्या होणारे हल्ले अधिक प्रभावी व अचूक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी रशियन फौजांना नवी शस्त्रे व संरक्षणयंत्रणाही देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
पूर्व युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या बाखमतवरील ताब्यासाठी रशियन फौजांनी आपली ताकद पणाला लावली आहे. जीवितहानी व इतर नुकसान होत असतानाही रशियन तुकड्या टप्प्याटप्प्याने या शहरात आगेकूच करीत आहेत. युक्रेनी फौजांना शहराच्या पश्चिम भागात अडकविण्यात रशियाला यश मिळाल्याचे सांगण्यात येते. युक्रेनचे जवळपास १५ हजार जवान बाखमतच्या पश्चिम भागात केंद्रित झाले असून त्यांना बाहेरून मिळणारी रसद तोडण्यात यश आल्याचा दावा रशियन सूत्रांनी केला आहे. रशियन फौजांच्या आक्रमकतेमुळे युक्रेनी लष्कराला बचाव करणे अधिकाधिक अवघड बनल्याची कबुली स्थानिक युक्रेनी कमांडर्सनी दिली.
बाखमतवरील नियंत्रणाबरोबरच डोनेत्स्क प्रांतातील इतर शहरांवरही रशियाने मारा सुरू केला आहे. स्लोव्हिआन्स्क, ॲव्हडिव्हका, मरिन्का, चॅसिव्ह यारसरह डोनेत्स्क शहरानजिकच्या भागातील हल्ल्यांची धार वाढविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये रशियन फौजांनी या भागात मोठे हवाईहल्ले चढविले आहेत. २४ तासांमध्ये रशियाने जवळपास ३२ हवाईहल्ले केल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी रात्री स्लोव्हिआन्स्क शहरावर दोन ‘एस-३००’ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. याव्यतिरिक्त रशियाने ४०हून अधिक रॉकेटस्चा मारा केल्याचेही सांगण्यात येते. झॅपोरिझिआला हवाईहल्ल्यांसह क्षेपणास्त्रांनीही लक्ष्य करण्यात आल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कुपिआन्स्कसह लिमन, डोनेत्स्क, झॅपोरिझिआ व खेर्सन या भागांमध्ये झालेल्या संघर्षात रशियन लष्कराने ६०० हून अधिक युक्रेनी जवानांना ठार केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. डोनेत्स्क शहरानजिक झालेल्या संघर्षात जवळपास २५० तर दक्षिण डोनेत्स्क व झॅपोरिझिआजवळ झालेल्या संघर्षात १८० युक्रेनी जवान ठार झाल्याचे संरक्षण विभागाने म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |