वॉशिंग्टन – ‘अमेरिकेकडून डॉलरचा हत्यारासारखा झालेला वापर व चलनविषयक धोरणात होणारे बदल यामुळे जागतिक व्यापारासाठीचे एकमेव चलन म्हणून अमेरिकी डॉलरचे स्थान संपले आहे. जागतिक स्तरावर डि-डॉलरायझेशनची सुरुवात झाली असून ती पुढेही सुरू राहिल. हळुहळू किंवा कदाचित अपेक्षेपेक्षा झटपट डॉलरने आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली पत गमावलेली असेल’, असा इशारा अमेरिकी अर्थतज्ज्ञ पीटर सी. अर्ल यांनी दिला. त्याचवेळी चीनच्या दौऱ्यावर असलेले ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी, ब्रिक्स देशांनी अमेरिकी डॉलरचा वापर सोडून स्थानिक चलनांमध्ये व्यापार करावा असे आवाहन केले आहे.
इराण व रशियन अर्थव्यवस्थेवर लादलेले निर्बंध आणि त्याचे झालेले परिणाम यामुळे जगातील इतर देशांनीही डॉलरच्या बाबतीत आपत्कालिन योजनांची तयारी सुरू केली आहे. अमेरिकी डॉलरला पर्याय असणारे राखीव चलन या मुद्यावर गेली काही दशके चर्चा सुरू असली तरी नजिकच्या काळात त्याला अधिक वेग आल्याकडे र्थतज्ज्ञ पीटर सी. अर्ल यांनी लक्ष वेधले. ब्राझिल व चीनमध्ये युआन व रिआलच्या वापरासंदर्भात झालेला करार, भारत व मलेशियाने स्थानिक चलनांचा सुरू केलेला वापर आणि चीन-युएई-फ्रान्समधील इंधनव्यवहारात झालेला युआनचा वापर या घटनांचा उल्लेख अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी आपल्या लेखात केला आहे.
अमेरिकेने आर्थिक व व्यापारी युद्धात डॉलरचा हत्यारासारखे केलेला वापर आणि अमेरिकी प्रशासनाकडून डॉलरसंदर्भात घेण्यात आलेले चुकीचे निर्णय यामुळे अनेक देश हळुहळू डॉलरपासून दूर जात असल्याची जाणीव अर्थतज्ज्ञ अर्ल यांनी करून दिली. २००८-०९सालच्या आर्थिक मंदीनंतर राबविलेले धोरण तसेच २०२०च्या कोरोना साथीनंतर घेतलेले निर्णय यामुळे डॉलरवरचा विश्वास घटत गेल्याचा दावा अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी केला. डॉलरसारख्या चलनाची सहज उपलब्धता जमेची बाजू असली तरी त्याची घसरण रोखता येणार नाही व ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, असे अर्ल यांनी बजावले.
अमेरिकी अर्थतज्ज्ञ ‘डि-डॉलरायझेशन’बाबत इशारे देत असतानाच ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी उघडपणे डॉलरचा वापर सोडण्याचे आवाहन केले आहे. चीन दौऱ्यावर असलेले राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा ब्रिक्स गटाच्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी, आपण सर्व देश आजही व्यापारासाठी डॉलर का वापरतो? व डॉलरऐवजी आपल्या स्थानिक चलनांमध्ये व्यवहारा का करीत नाही? असे थेट प्रश्न विचारले. सोन्याचे पाठबळ काढल्यानंतर अमेरिकी डॉलरचा वापरायचा हा निर्णय कोणी घेतला, या शब्दात त्यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना लक्ष्य केले.
आजच्या घडीला व्यापारी निर्यातीसाठी सगळे देश डॉलरच्या मागे धावत आहेत. मात्र खरेतर या देशांनी आपल्या चलनांचा वापर करायला हवा. ब्रिक्स गटाच्या बँकेने चीन व ब्राझिल आणि ब्राझिल व इतर ब्रिक्स देशांमधील व्यापारासाठी चलन विकसित करायला हवे, असेही ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. गेल्याच महिन्यात ब्राझिलने व्यापार व आर्थिक व्यवहारांमध्ये चीनच्या युआन चलनाचा वापर करण्यासंदर्भात करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्याचवेळी रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘ब्रिक्स’ गट नवे चलन विकसित करीत असल्याचे संकेतही दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |