खार्तूम – सत्तेसाठी सुदानच्या दोन लष्करप्रमुखांमध्ये पेटलेल्या संघर्षात १०० जणांचा बळी गेला. तर जखमींची संख्या हजारावर असल्याचे सांगितले जाते. सलग तिसऱ्या दिवशी लष्कर आणि निमलष्करीदलात पेटलेल्या या संघर्षात सुदानमध्ये कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाचे तीन कर्मचारी देखील मृत्यूमुखी पडले. हा संघर्ष जितका लांबेल, तितक्याच प्रमाणात सुदानमधील बळींची संख्या वाढत जाईल, असा दावा केला जातो.
पण सुदानचे लष्कर व निमलष्करीदलातील हा संघर्ष थांबण्याची शक्यता नसून येथील रुग्णालयांवरही हल्ले सुरू असल्याचे दिसू लागले आहे. सुदानचे लष्कर आणि निमलष्करीदलात शनिवारपासून पेटलेला संघर्ष सोमवारी तीव्र झाला. पहिले दोन दिवस दोन्ही गटांचे जवान सरकारी तसेच लष्करी ठिकाणे ताब्यात घेण्यासाठी गोळीबार तसेच बॉम्बहल्ल्यांचा वापर करीत होते. हवाई हल्ले फार क्वचित प्रमाणात केले जात होते. पण सोमवारी लष्कराने लढाऊ विमाने तर निमलष्करीदलाने हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने एकमेकांच्या प्रभाव क्षेत्रातील हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. राजधानी खार्तूम सर्वाधिक हल्ल्यांचे केंद्र ठरले आहे.
खार्तूममधील रुग्णालयांवर हल्ले होत असल्याची तक्रार येथील वैद्यकीय अधिकारी करीत आहेत. अल-शबा रुग्णालयावर जोरदार हल्ले झाले असून रुग्णांबरोबरच डॉक्टरदेखील सुरक्षित नसल्याची टीका होत आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक औषध पुरवठा नसल्याची माहिती समोर येत आहे. काही तासांसाठी हा संघर्ष थांबवून मानवतावादी सहाय्य पोहोचविण्याचा प्रस्ताव लष्कराने दिला होता. पण निमलष्करीदलाने हल्ले चढवून मानवतावादी सहाय्याचा मार्ग बंद केला. त्याचबरोबर या संघर्षामुळे सुदानमधील काही शहरांची जलव्यवस्था देखील मोडकळीस आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आपल्याला आघाडी मिळाल्याचे दावे दोन्ही गटांकडून केले जात आहेत. निमलष्करीदलाच्या ताब्यात गेलेली रेडिओ वाहिनी तसेच इतर ठिकाणे पुन्हा ताब्यात घेतल्याचे लष्कराने म्हटले आहे. तसेच जनरल डागलो यांच्या नेतृत्वाखालील निमलष्करीदल बरखास्त केल्याची मोठी घोषणा लष्करप्रमुख जनरल बुरहान यांनी केली. सुदानच्या निमलष्करीदलात सुमारे तीन लाख जवान आहेत. तसेच राजधानी खार्तूमसह प्रमुख शहरांची व्यवस्था या दलाकडे सोपविण्यात आली होती.
अशा परिस्थितीत निमलष्करीदलाने केलेल्या या बंडाचा सुदानच्या लष्कराला मोठा हादरा बसल्याचा दावा केला जातो. तीन दिवसांच्या संघर्षानंतरही लष्करप्रमुख जनरल बुरहान यांनी निमलष्करीदलाबरोबर चर्चा करण्याची तयारी व्यक्त केली. पण जनरल डागलो या चर्चेसाठी तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला संघर्षबंदीचा प्रस्तावही जनरल डागलो यांनी धुडकावला आहे.
दरम्यान, सुदान हा इंधनसंपन्न ओपेक प्लस सदस्य देश आहे. इंधनाबरोबरच सुदानमध्ये सोने, लोह, क्रोमाईट, झिंक, ॲल्युमिनिअम आणि निकेल या धातूंचा मोठा साठा आहे. यावर ताबा मिळविण्यासाठी निमलष्करीदलाचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जातो. सुदानमधील हा संघर्ष वेळीच मिटविला नाही तर या देशात गृहयुद्धाचा भडका उडेल, असा इशारा विश्लेषक देत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |