तेहरान – सौदी अरेबियाबरोबरचे सहकार्य आणि बायडेन प्रशासनाच्या मवाळ धोरणांमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या इराणने इस्रायलची शहरे नष्ट करण्याची धमकी दिली. ‘इस्रायलने इराणच्या विरोधात छोटीशी कारवाई जरी केली तरी तेल अविव आणि हैफा ही इस्रायली शहरे नष्ट होतील’, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी बजावले. काही तासांपूर्वीच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इराण म्हणजे आधुनिक काळातील ज्यूद्वेष्टा ‘नाझी जर्मनी’ असल्याचा गंभीर आरोप केला होता.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याने युरोपमधील सुमारे 60 लाख ज्यूधर्मियांना छळछावण्यांमध्ये डांबून त्यांची निर्घृणरित्या हत्या केली होती. इतिहासातील या काळ्याकुट्ट दिवसाची आठवण म्हणून जगभरात ‘हॉलोकॉस्ट रिमेंबरन्स डे’ साजरा केला जातो. इस्रायलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या या भयंकर स्मृतींना उजाळा दिला. इराण हा आधुनिक काळातील नाझी जर्मनी असल्याचा आरोप पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला. नाझी जर्मनीप्रमाणे इराणकडूनही ज्यूधर्मियांना धोका असल्याचा इशारा नेत्यान्याहू यांनी दिला.
याआधी इराणने इस्रायलच्या विनाशाच्या व इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. गेल्या काही महिन्यांमध्ये तुर्की, ग्रीस व युरोपिय देशांमध्ये इस्रायली व ज्यूधर्मियांवरील हल्ल्याचे कट उधळले आहेत. यामागे इराण असल्याचे आरोप इस्रायलच्या मोसादबरोबरच संबंधित देशांच्या यंत्रणांनी केले होते. अमेरिकन नेते व गुप्तचर यंत्रणांनीदेखील ज्यूधर्मियांना असलेल्या धोक्याचे इशारे दिले होते. अशा परिस्थितीत, इराणकडून ज्यूधर्मियांना असलेल्या धोक्याचा उल्लेख करून इस्रायलच्या पंतप्रधानांनी गेल्या काही महिन्यांमधील घडामोडींकडे लक्ष वेधले.
मंगळवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये आयोजित लष्कर दिनाच्या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी इस्रायली पंतप्रधानांच्या या आरोपांना धमकीने उत्तर दिले. इराण किंवा इतर कोणत्याही शत्रू देशाने इस्रायलवर हल्ल्याची चूक केली तर थेट इस्रायलची शहरे लक्ष्य केली जातील, असे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी जाहीर केले. दोन दिवसांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रवक्त्याने इस्रायलचा विनाश होईल, असे धमकावले होते. याआधीही इराणच्या नेत्यांनी इस्रायलच्या तेल अविव व हैफा या दोन शहरांनाच लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. यापैकी तेल अविव ही इस्रायलची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
गेल्या काही महिन्यांमधील घडामोडी इराणच्या या धमकीमागे असल्याचा दावा केला जातो. 2016 सालापासूनचे मतभेद बाजूला करून इराण व सौदी अरेबियाने संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच दोन्ही देशांमधील दूतावास नव्याने सुरू होतील. सौदीने घेतलेल्या पुढाकारानंतर युएई, बाहरिन या देशांनी देखील इराणबरोबर चर्चा सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे आखातातील दोन गट एकत्र येत असून इस्रायलने इराणला एकटे पाडण्यासाठी अरब देशांबरोबर केलेल्या अब्राहम कराराला हा हादरा असल्याचा दावा इराण करीत आहे.
तर अमेरिकेचे बायडेन प्रशासनाने इराणबरोबरच्या अणुकरारावर ठाम आहेत. इराण अण्वस्त्रांनी सज्ज होण्यासही बायडेन प्रशासनाचा विरोध नसल्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. त्याचबरोबर इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी लष्करी कारवाईचा पर्यायही बायडेन प्रशासनाने हातापासून वेगळा केला आहे. त्यामुळे इराणचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. इराणचे नेते व लष्करी अधिकारी तसेच हिजबुल्लाहसारखी इराणसमर्थक संघटना तसेच गाझापट्टीतील हमास या संघटना इस्रायलला जवळपास एकसारख्या शब्दांमध्ये विनाशाच्या धमक्या देत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |