रशियाकडून डोन्बाससह दक्षिण व उत्तर युक्रेनमध्ये मोठे हल्ले

- बाखमतसह इतर शहरांमधील कारवाई प्रतिहल्ल्यांचा भाग असल्याचा युक्रेनी नेत्यांचा दावा

मॉस्को/किव्ह – गेल्या २४ तासांमध्ये रशियन फौजांनी डोन्बास क्षेत्रासह दक्षिण तसेच उत्तर युक्रेनमध्ये मोठे हल्ले चढविले आहेत. रशियाच्या संरक्षण विभागाने याची माहिती दिली. डोन्बास क्षेत्रातील बाखमतसह क्रेमिना, ॲव्हडिव्हका, वेस्टर्न डोनेत्स्क व वुहलेदर भागात ५०हून अधिक हल्ले करण्यात आले. दक्षिण युक्रेनमधील ओडेसा शहरावर ड्रोन्सचा मारा करण्यात आला, तर उत्तर युक्रेनमधील चेर्निहिव्ह प्रांताला मॉर्टर्सच्या सहाय्याने लक्ष्य करण्यात आले. रशियाचे हे हल्ले सुरू असतानाच, डोन्बास क्षेत्रात युक्रेनी फौजांकडून करण्यात येणारी कारवाई हा प्रतिहल्ल्यांचाच भाग असल्याचा दावा युक्रेनच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी केला आहे.

मोठे हल्ले

रशिया-युक्रेन युद्धाला ४००हून अधिक दिवस उलटले असून संघर्ष दिवसेंदिवस अधिकच चिघळताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये बाखमतमध्ये सुरू असलेल्या प्रखर लढाईने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले असून रशियाने बहुतांश शहरावर ताबा मिळविल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रशियाच्या ॲसॉल्ट टीम्सनी शहरातील तीन नवे भाग ताब्यात घेतल्याची माहितीही रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. मात्र रशियाच्या सातत्यपूर्ण हल्ल्यांनंतरही युक्रेनी लष्कराने शहरातून माघार घेण्याचे नाकारले असून १० हजारांहून अधिक युक्रेनी जवान अद्यापही पश्चिम बाखमतमध्ये असल्याचे सांगण्यात येते.

मोठे हल्ले

बाखमतवरील नियंत्रणाला रशियाने प्राधान्य दिले असले तरी त्याचवेळी इतर भागांमधील हल्ल्यांची तीव्रता कमी होऊ दिलेली नाही. उत्तरेच्या खार्किव्ह प्रांतापासून ते दक्षिणेतील ओडेसा शहरापर्यंत रशियन फौजांचे हल्ले कायम असल्याचे नव्या माहितीवरून समोर येत आहे. बुधवारी रात्री रशियाने ओडेसा शहरावर ड्रोनहल्ला चढविला. यासाठी दहापेक्षा अधिक आत्मघाती ड्रोन्सचा वापर करण्यात आला. रशियाने केलेल्या ड्रोनहल्ल्यांमधील काही ड्रोन्स पाडल्याचा दावा युक्रेनी फौजांनी केला.

मोठे हल्ले

बुधवारी तसेच गुरुवारी पहाटे रशियाने डोनेत्स्क प्रांतातील वुहलेदर शहरावर तब्बल ३० हल्ले चढविले. या हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रे, रॉकेटस्‌‍ तसेच तोफांचा वापर करण्यात आला. त्याचवेळी ॲव्हडिव्हका, क्रेमिना, वेस्टर्न डोनेत्स्क व झॅपोरिझिआ प्रांतातही मोठ्या प्रमाणावर मारा करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. तर मंगळवारी रशियन लष्कराच्या कारवायांमध्ये ६००हून अधिक युक्रेनी जवान ठार झाल्याचेही संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बाखमतसह मेरिन्का, ॲव्हडिव्हका व लिमनमध्ये युक्रेनी फौजांकडून करण्यात येणारी कारवाई ही रशियाविरोधातील प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेचा भाग असल्याचा दावा वरिष्ठ युक्रेनी मंत्र्यांनी केला. युक्रेनी फौजा या भागांमध्ये रशियन लष्करावर हल्ले करीत असून त्यांना प्रतिहल्ल्यांची कारवाई म्हणता येईल, असे युक्रेनच्या उपसंरक्षणमंत्री हॅना मॅलिअर यांनी म्हटले आहे. मॅलिअर यांच्या वक्तव्यामुळे युक्रेनकडून मोठ्या प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू होईल, या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

युरोपातील ‘नॉर्थ सी’ क्षेत्रात रशियन ‘स्पाय शिप्स’च्या हालचाली वाढल्या – नॉर्डिक देशांचा दावा

ऑस्लो – रशियन नौदलाचा भाग असलेल्या ‘स्पाय शिप्स’च्या युरोपातील ‘नॉर्थ सी’ क्षेत्रातील हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा नॉर्डिक देशांनी केला आहे. स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे व फिनलँड या चार देशांच्या प्रसारमाध्यमांनी केलेल्या शोधमोहिमेतून ही बाब समोर आली. रशियाची ‘स्पाय शिप्स’ नॉर्डिक देशांमधील इंधन व ऊर्जा प्रकल्पांसह युद्धसरावांचीही टेहळणी करीत असल्याचा संशय प्रसारमाध्यमांसह गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रशियाचे ‘ॲडमिरल व्लादिमिर्स्की’ नावाचे रिसर्च शिप मोठ्या कालावधीकरिता नॉर्थ सी क्षेत्रात वावरताना आढळले असून हे टेहळणी जहाज असल्याचा आरोप नॉर्डिक देशांनी केला. रशियाने हे आरोप फेटाळले असून करण्यात आलेले दावे तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info