स्टॉकहोम – गेल्या वर्षी जागतिक लष्करी खर्चात तब्बल ३.७ टक्क्यांची वाढ झाली असून हा लष्करी खर्च २.२४ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. नेहमीप्रमाणे अमेरिका, चीन आणि रशिया हे लष्करावरील खर्चात आघाडीवर आहेत. पण शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच युरोपिय देशांच्या लष्करी खर्चातही वाढ पहायला मिळाल्याचे ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट-सिप्री’ने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे.
सलग आठव्या वर्षी जागतिक लष्करी खर्चात वाढ झाल्याची नोंद सिप्रीने केली. पण याआधीच्या तुलनेत २०२२ साली जागतिक लष्करी खर्चात झालेली वाढ लक्षवेधी आणि चिंता वाढविणारी असल्याचे संकेत सिप्रीने दिले आहेत. अपेक्षेप्रमाणे अमेरिकेचा या लष्करी खर्चात ३९ टक्के इतका हिस्सा असून या देशाने गेल्या वर्षी ८७७ अब्ज डॉलर्स खर्च केली. मात्र अमेरिकेच्या लष्करी खर्चात फक्त ०.७ टक्के इतकीच वाढ झाली आहे. १९८१ सालानंतर पहिल्यांदाच अमेरिकेला चलनफुगवट्याचा सामना करावा लागत असून त्याचा परिणाम लष्करी खर्चावर झाल्याचा दावा सिप्रीने केला.
या तुलनेत चीनच्या लष्करी खर्चात ४.२ टक्के इतकी वाढ दिसली असून या देशाने २९२ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. अमेरिका व चीनच्या तुलनेत लष्करी खर्चात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियाच्या खर्चात ९.२ टक्के इतकी मोठी वाढ दिसली. तर शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच युरोपिय देशांच्या लष्करी खर्चात १२ टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद सिप्रीने केली. १९८९ साली बर्लिनची भिंत पडल्यानंतर युरोपच्या लष्करी खर्चात ही वाढ पाहिल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
युरोपच्या लष्करी खर्चात झालेल्या या वाढीसाठी रशिया-युक्रेनमधील युद्ध जबाबदार असल्याचे सिप्रीने आपल्या अहवालात म्हटले आहे. युक्रेनच्या युद्धामुळे युरोपिय देशांनी आपल्या संरक्षणखर्चात वाढ केल्याचा दावा सिप्रीने केला. युक्रेनच्याच लष्करी खर्चात सात पटीने वाढ झाल्याचे म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |