युक्रेनकडून क्रिमिआवर पुन्हा ड्रोन हल्ला

- ब्लॅक सी क्षेत्रात युक्रेनचे २२ ड्रोन्स नष्ट केल्याचा रशियाचा दावा

किव्ह/मॉस्को – युक्रेनने रशियाच्या क्रिमिआ प्रांतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ले चढविले. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे युक्रेनच्या १० ड्रोन्सनी क्रिमिआतील सेव्हॅस्टोपोल बंदर व इतर भागांना लक्ष्य केले. युक्रेनचे हे ड्रोन हल्ले रशियाच्या ‘एअर डिफेन्स’ व ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ यंत्रणांनी परतवून लावल्याचा दावा क्रिमिआच्या गव्हर्नरनी केला. तर गेल्या २४ तासांमध्ये ब्लॅक सी क्षेत्रात युक्रेनची २२ ड्रोन्स नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. दरम्यान, झखार प्रायलेपिन या रशियन मिलिटरी ब्लॉगरवरील हल्ला हे दहशतवादी कृत्य असून ते युक्रेनी यंत्रणांनी घडविल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र विभागाने केला.

ड्रोन

गेल्या काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनच्या विविध प्रांतांमध्ये प्रखर हल्ले सुरू केले असून त्यांची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. क्षेपणास्त्र, ड्रोन्स, रॉकेटस्‌‍, मॉर्टर्स, तोफा, रणगाडे यांचा सातत्याने मारा करण्यात येत आहे. युक्रेनसह पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमेही रशियन सैन्याचा अविरत मारा सुरू असल्याची कबुली देत आहेत. रशियाकडून होणाऱ्या या माऱ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनने ड्रोन हल्ल्यांचा पर्याय स्वीकारल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्याभरात युक्रेनने राजधानी मॉस्को, क्रिमिआ, बेलगोरोद, ब्रिआन्स्क या भागांना ड्रोन्सचे लक्ष्य केले आहे. या हल्ल्यांना कमीअधिक प्रमाणात यश मिळाल्याचे समोर येत आहे.

ड्रोन

शनिवारी रात्री तसेच रविवारी युक्रेनने पुन्हा एकदा क्रिमिआवर ड्रोन हल्ले केले. क्रिमिआतील सेव्हॅस्टोपोल बंदर व नजिकच्या भागाला ड्रोन्सचे लक्ष्य बनविण्यात आले होते. हल्ल्यासाठी १० ड्रोन्सचा वापर करण्यात आला. रशियाच्या ‘एअर डिफेन्स सिस्टिम्स’ तसेच ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम्स’ने हे हल्ले परतवून लावल्याची माहिती क्रिमिआच्या गव्हर्नरनी दिली. शहरातील कोणत्याही भागाचे नुकसान झाले नसल्याचा दावाही करण्यात आला.

ड्रोन

युक्रेनमधील सोशल मीडिया चॅनल्सनी दोन क्रिमिआतील भागांचे नुकसान झाल्याच्या पोस्टस्‌‍ प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही. रशियाच्या संरक्षण विभागाने शनिवारी रात्रीपासून ब्लॅक सी क्षेत्रात युक्रेनचे तब्बल २२ ड्रोन्स नष्ट केल्याची माहिती दिली. युक्रेनने रशियाच्या क्रिमिआ प्रांतात गेल्या नऊ दिवसांमध्ये तीन ड्रोन हल्ले घडविले आहेत. यातील एका हल्ल्यात इंधनसाठ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते. रशियाने २०१४ साली केलेल्या हल्ल्यात क्रिमिआ प्रांत ताब्यात घेतला होता. या प्रांतातील सेव्हॅस्टोपोल शहर हे ब्लॅक सी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखण्यात येते. हे बंदर रशियाच्या ‘ब्लॅक सी फ्लीट’चे मुख्यालयही असून रशियाच्या अनेक युद्धनौका व पाणबुड्या या बंदरात तैनात आहेत. क्रिमिआवरील नियंत्रणासाठी सेव्हॅस्टोपोलचा ताबा निर्णायक मानला जातो. त्यामुळेच युक्रेनने गेल्या महिन्याभरात सातत्याने या शहराला आपले लक्ष्य बनविल्याचे दिसत आहे.

दरम्यान, शनिवारी रशियाच्या नोव्होगोरोद प्रांतात झालेल्या एका बॉम्बस्फोटात झखार प्रायलेपिन हा मिलिटरी ब्लॉगर गंभीर जखमी झाला असून कोमात गेल्याचे सांगण्यात येते. स्फोटात प्रायलेपिनच्या गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट दहशतवादी हल्ला असून यामागे युक्रेन व अमेरिकेचा हात असल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र विभागाने केला. गेल्या महिन्याभरात पुतिनसमर्थक रशियन मिलिटरी ब्लॉगरवर हल्ला होण्याची ही दुसरी घटना ठरते. एप्रिल महिन्यात एका महिलेने घडविलेल्या स्फोटात व्लादलिन तातार्स्की या मिलिटरी ब्लॉगरचा बळी गेला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info