रशियाचे युक्रेनची राजधानी किव्हसह ओडेसा व खार्किव्हवर मोठे हवाईहल्ले

- दीर्घ पल्ल्याची ‘बॉम्बर्स’ व ड्रोन्सचा वापर

रशियाचे युक्रेनची राजधानी किव्हसह ओडेसा व खार्किव्हवर मोठे हवाईहल्ले

मॉस्को/किव्ह  – रशियात ९ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘व्हिक्टरी डे’च्या पार्श्वभूमीवर रशियन सैन्याने युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढविली आहे. रविवारी रात्री व सोमवारी रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह ओडेसा, खेर्सन, मायकोलेव्ह व खार्किव्हवर जोरदार हवाईहल्ले चढविले. हल्ल्यांसाठी रशियाने दीर्घ पल्ल्याच्या बॉम्बर्स विमानांसह ड्रोन्सचा वापर केल्याचे समोर आले आहे. हे हल्ले सुरू असतानाच डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहराच्या ९५ टक्क्यांहून अधिक भागावर नियंत्रण मिळविल्याचा दावा ‘वॅग्नर ग्रुप’ या रशियन लष्करी कंपनीने केला.

major airstrikes, हवाईहल्ले  

एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून रशियाने पुन्हा एकदा मोठे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. रविवारी रात्री व सोमवारी केलेले हल्ले हा गेल्या १० दिवसांमधील पाचवा मोठा हल्ला ठरतो. या हल्ल्यांमध्ये राजधानी किव्ह तसेच दक्षिणेतील ओडेसा शहराला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. रविवारी रात्री तसेच सोमवारी केलेल्या हल्ल्यांमध्ये ओडेसा शहरावर तब्बल आठ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यासाठी क्रिमिआत तैनात असलेल्या ‘टीयू-२२एम३’ या दीर्घ पल्ल्याच्या बॉम्बर्स विमानांचा वापर करण्यात आल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले.

ओडेसा शहरावरील हल्ल्यात एका कोठारासह अनेक इमारतींना आगी लागल्या असून जीवितहानी झाल्याचेही वृत्त आहे. राजधानी किव्हवर क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचा मारा करण्यात आला. किव्हमध्येही मोठ्या प्रमाणात आगी लागल्या असून गाड्या तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. किव्हवर ३०हून अधिक आत्मघाती ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले केल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. त्याचवेळी बहुतांश क्षेपणास्त्रे व ड्रोन्स नष्ट करण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण विभागाने केला.

राजधानी किव्ह व ओडेसाबरोबरच खार्किव्ह, खेर्सन व मायकोलेव्ह प्रांतांवरही मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले. खेर्सनवरील हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रांबरोबर दीर्घ पल्ल्याच्या रॉकेटस्‌‍चाही वापर करण्यात आला. रशियन सैन्याने ६०हून अधिक हवाईहल्ले केले असून रॉकेटस्‌‍, तोफा व मॉर्टर्सच्या सहाय्याने ५२ हल्ले चढविल्याचे युक्रेनच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. नव्या वर्षात क्षेपणास्त्रे, ड्रोन व रॉकेटस्‌‍च्या सहाय्याने केलेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा युक्रेनी माध्यमांनी केला आहे.

रशियाचे वाढते क्षेपणास्त्र व ड्रोनहल्ले युक्रेनच्या हवाईसुरक्षा यंत्रणांची क्षमता संपविण्याच्या उद्देशाने असल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. काही महिन्यांपूर्वी पाश्चिमात्य यंत्रणा तसेच अधिकाऱ्यांनी युक्रेन मोठ्या प्रमाणात ‘एअर डिफेन्स मिसाईल्स’चा वापर करीत असून मे महिन्यात त्यांच्याकडील साठा संपुष्टात येऊ शकतो, असे बजावले होते. हे ध्यानात घेऊन रशियाने आपल्या हवाईहल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे, असे युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने म्हंटले आहे.

दरम्यान, डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहरासाठी सुरू असणारा संघर्ष अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाची लष्करी कंपनी ‘वॅग्नर ग्रुप’ने बाखमतमधील ९५ टक्क्यांहून अधिक भाग रशियाच्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे. येत्या काही दिवसात हे शहर रशियन नियंत्रणाखाली आलेले असेल, असे ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येव्गेनी प्रिगोझिन यांनी सांगितले.

हिंदी      English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info