सुदानमधील संघर्षात ६०४ जणांचा बळी

- राजधानी खार्तूम हवाई हल्ल्यांनी हादरली

सुदानमधील संघर्षात ६०४ जणांचा बळी

खार्तूम – सुदानचे लष्कर आणि निमलष्करीदलात भडकलेल्या संघर्षात ६०४ जणांचा बळी गेला, तर सात हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन-डब्ल्यूएचओ’ने ही माहिती दिली. पण जीवितहानीची संख्या सुदानच्या यंत्रणेने पुरविलेल्या माहितीवर आधारीत असून बळींची संख्या याहून अधिक असल्याचा इशारा स्थानिक माध्यमे देत आहेत. सौदी अरेबियामधील संघर्षबंदीची चर्चा फिस्कटल्यापासून राजधानी खार्तूममधील संघर्ष तीव्र झाला आहे. लष्कराची लढाऊ विमाने आणि निमलष्करीदलांचे हेलिकॉप्टर्स खार्तूममधील परस्परांच्या ठिकाणांना लक्ष्य करीत आहेत.

Sudan conflict, ६०४ जणांचा बळी२०२१ साली सुदानमधील सरकारविरोधात बंडाळी करणारे लष्करप्रमुख जनरल बुरहान आणि निमलष्करीदलाचे प्रमुख जनरल दागालो यांच्यातील संघर्ष तीव्र बनला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त राष्ट्रसंघ व आफ्रिकन महासंघाने या दोन्ही जनरल्समध्ये संघर्षबंदी घडविण्याचे प्रयत्न केले. जनरल बुरहान सुदानमध्ये लोकशाही सरकार प्रस्थापित करण्यावर ठाम आहे. पण निमलष्करीदलाचे प्रमुख जनरल दागालो यासाठी तयार नाही. लोकशाही सरकार प्रस्थापित करण्याची प्रक्रिया वर्षभरासाठी पुढे ढकलावी, अशी जनरल दागालो यांची अट आहे.

हा संघर्ष रोखण्यासाठी कुठलाही गट पुढाकार घ्यायला तयार नाही. सौदीमधील बैठकीतून ही बाब निदर्शनास आली. लष्कर व निमलष्करीदल सुदानवरील ताबा सोडायला तयार नाही. तसेच सुदानमधील या संघर्षात आपणच विजय ठरू, असा दावा हे लष्करी अधिकारी करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी सौदीत फिस्कटलेल्या या चर्चेनंतर सुदानमध्ये भडकलेल्या संघर्षात किमान ५० जणांचा बळी गेला. त्यामुळे सुदानमधील बळींची संख्या ६०४ झाल्याचा दावा डब्ल्यूएचओने केला. पण राजधानी खार्तूम व मोठ्या शहरांमधील जीवितहानीची माहितीच सुदानच्या यंत्रणा देत आहेत. दर्फूर व इतर भागातील संघर्षात बळी गेलेल्यांबाबत सविस्तर माहिती आलेली नाही. काही शहरांमधील लूटमारच्या घटनांमध्ये देखील नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे सुदानमधील गृहयुद्धातील बळींची संख्या याहून अधिक असल्याचा दावा केला जातो.

गेल्या चार आठवड्यांपासून सुदानमध्ये सुरू असलेले गृहयुद्ध इतक्या लवकर संपुष्टात येणार नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. पाश्चिमात्य देश सुदानमधील हा संघर्ष सोडविण्यासाठी लष्कर व निमलष्करीदलावर दबाव टाकत नसल्याची तक्रार माध्यमे व मानवाधिकार संघटना करीत आहेत. पण हे गृहयुद्ध वेळीच थांबविले नाही. येथील हिंसाचार रोखला नाही तर सुदानमधील उपासमारी विक्रमी स्तरावर पोहोचेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ या संघटनेने दिला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सुदानमधील २० ते २५ लाख नागरिक उपासमारीला सामोरे जाऊ शकतात. १५ एप्रिलपासून भडकलेल्या या संघर्षामुळे सुदानमधील अन्नधान्याच्या किंमती पुढील तीन ते सहा महिन्यात २५ टक्क्यांनी महागणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाची मानवाधिकार संघटना करीत आहे. या संघर्षामुळे सुदानमधील शेतीव्यवसाय बाधित झाला असून याचा परिणाम अन्नधान्याच्या किंमतीवर होत असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info