बाखमत/मॉस्को/किव्ह – गेल्या वर्षी मे महिन्यात डोनेत्स्क प्रांतातील महत्त्वाचे बंदर असलेले मारिपोल रशियन लष्कराने दीर्घ संघर्षानंतर ताब्यात घेतले होते. मारिपोलवरील ताब्याला वर्ष पूर्ण होत असतानाच रशियन सैन्याने डोन्बासमधील सामरिकदृष्ट्या निर्णायक जागा असणारे बाखमत शहर ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री रशियातील खाजगी लष्करी कंपनी ‘वॅग्नर ग्रुप’ने काही फोटोग्राफ्स प्रसिद्ध करीत बाखमतवर रशियाने नियंत्रण मिळविल्याचे जाहीर केले. रशियाच्या संरक्षण विभागाने त्याची पुष्टी केली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही अभिनंदन करणारा संदेश प्रसिद्ध केला. मात्र युक्रेनने आपला पराभव मान्य केलेला नसून जी७साठी जपानमध्ये असलेल्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपले सैन्य अजूनही बाखमतमध्ये असल्याचा दावा केला.
युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील मध्यवर्ती भागात वसलेले शहर म्हणून बाखमत सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या शहरातून डोन्बास क्षेत्रातील विविध शहरांना जोडणारे रस्ते जात असल्याने डोन्बासवरील नियंत्रणाच्या दृष्टीने हे शहर रशियन फौजांसाठी निर्णायक ठरते. गेल्या काही महिन्यांपासून बाखमतसाठी संघर्ष करणाऱ्या रशियन लष्कराने नवीन वर्षात त्याला प्राधान्य दिले होते. नव्या लष्करी तुकड्यांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री तैनात करण्यात आली होती. रशियन लष्कराबरोबरच खाजगी लष्करी कंपनी असणाऱ्या ‘वॅग्नर ग्रुप’नेही आपल्या आघाडीच्या तुकड्या बाखमतमध्ये धाडल्या होत्या.
त्यानंतर जवळपास २२४ दिवसांच्या संघर्षानंतर बाखमतवर संपूर्ण ताबा मिळविण्यात यश आल्याचे ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येव्गेनी प्रिगोझिन यांनी शनिवारी जाहीर केले. प्रिगोझिन यांच्या या दाव्याला रशियाच्या संरक्षण विभागाने दुजोरा दिला आहे. बाखमत (रशियन उल्लेखानुसार आर्टिओमोवस्क) पूर्णपणे मुक्त करण्यात आले आहे, असे निवेदन रशियाच्या संरक्षण विभागाने दिले. संरक्षण विभागाच्या या निवेदनानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही याची दखल घेत अभिनंदनाचा संदेश जारी केल्याचे वृत्त रशियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. या संदेशात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ‘वॅग्नर ग्रुप’सह रशियन सैन्याची प्रशंसा केली आहे. विशेष कामगिरी करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असेही रशियन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले.
रशियाकडून करण्यात आलेल्या या घोषणांनंतर युक्रेनने पराभव स्वीकारण्याचे नाकारले आहे. युक्रेनचे वरिष्ठ नेते तसेच मंत्र्यांनी बाखमतमध्ये युक्रेनी लष्कराचा संघर्ष अजून सुरू असल्याचे दावे केले. जी७ बैठकीच्या निमित्ताने जपानमध्ये असलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही रशियाचे दावे फेटाळले. मात्र त्याचवेळी रशियाने बाखमतचा मोठ्या प्रमाणात विध्वंस घडविला असून आता बाखमतची जागा आमच्या हृदयात आहे, असे वक्तव्यही केले. त्यामुळे युक्रेनच्या स्थितीबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
रविवारी, बाखमतमधील युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात युक्रेनच्या लष्करी तुकड्या शहराला वेढा घालण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात आले. यात युक्रेनी सैन्य शहराच्या बाहेर असल्याचा उल्लेख असल्याने युक्रेनी लष्कर व राजकीय वर्तुळात मतभेद असल्याचे उघड होत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |