अणुकरार करण्यासाठी इराणकडे काही आठवड्यांचाच अवधी आहे

- अमेरिकेच्या विशेषदूतांचा इराणला इशारा

वॉशिंग्टन/जेरूसलेम – ‘ज्या गतीने इराण आपला अणुकार्यक्रम चालवित आहे, ते पाहता अणुकरार पुनर्जीवित करण्यासाठी इराणकडे अवघे काही आठवडेच शिल्लक आहेत. यात अपयश आले तर संकटाचा काळ सुरू होईल’, असा इशारा अमेरिकेने इराणबरोबरच्या अणुकरारासाठी नियुक्त केलेले विशेषदूत रॉबर्ट मॅली यांनी दिला. तर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिले आहे.

अणुकरार

गेल्या काही दिवसांपासून व्हिएन्ना येथे इराणबरोबर सुरू असलेली अणुकराराबाबतची थेट चर्चा तहकूब केली आहे. येत्या सोमवारपासून आपण या चर्चेत सहभागी होणार असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. पण अणुकरार करण्यासाठी इराण वेळकाढू भूमिका स्वीकारीत असल्याची टीका जोर पकडू लागली आहे. इराणबरोबरच्या अणुकरारासाठी बायडेन प्रशासनाने नियुक्त केलेले विशेषदूत रॉबर्ट मॅली यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना इराणच्या या भूमिकेवर ताशेरे ओढले.

‘इराणने आपला अणुकार्यक्रम स्थगित केला तर अणुकरारावर वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेकडे पुरेसा वेळ उपलब्ध असेल. पण इराणने आपल्या अणुकार्यक्रमाची गती कायम राखली तर अणुकरार पुनर्जीवित करण्यासाठी इराणकडे अवघे काही आठवडेच शिल्लक असतील’, असे मॅली म्हणाले. त्या परिस्थितीत येत्या काळात २०१५ सालचा अणुकरार संपुष्टात आणून पूर्णपणे वेगळा करार करावा लागेल. अन्यथा भीषण संकटाच्या काळातून प्रवास जावे लागेल, असा इशारा मॅली यांनी दिला.

अणुकरार

अमेरिकेचे विशेषदूत इराणला अणुकराराबाबत इशारा देत असताना, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी दोन दिवसांचा इस्रायलचा दौरा केला. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट, परराष्ट्रमंत्री येर लॅपिड व संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांची भेट घेऊन सुलिवन यांनी इराणच्या धोक्याबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. अणुकार्यक्रमापासून दहशतवादी गटांना इराणचे असलेले समर्थन यावर अमेरिका व इस्रायलच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

या भेटीत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत तीन पर्याय मांडले. पुढच्या काही आठवड्यांमध्ये २०१५ सालचा अणुकरार इराणने मान्य करावा, या पहिल्या पर्यायाचा समावेश आहे. तर अणुकार्यक्रम रोखण्यासाठी इराणला निर्बंधातून मुक्त करणे, या दुसर्‍या पर्यायावर इस्रायलच्या नेत्यांनी आक्षेप नोंदविला.

गेल्या काही महिन्यांमध्येच इराणने युरेनियमचे संवर्धन वाढवून किमान अणुबॉम्बची निर्मिती करता येईल, इतका साठा केल्याचे इस्रायली नेत्यांनी लक्षात आणून दिले. अशा परिस्थितीत, अणुकार्यक्रम थांबविण्यासाठी इराणला निधी पुरविणे किंवा निर्बंध काढणे, योग्य ठरणार नसल्याचे इस्रायली नेत्यांनी बजावले. तर तिसर्‍या पर्यायात अणुकरार होणार नसेल तर इराणवर नवे निर्बंध लादण्याचा उल्लेख होता. यावरुन इराणवर लष्करी कारवाई करण्याच्या इस्रायलच्या भूमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे संकेत बायडेन प्रशासनाने दिले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info