Breaking News

सिरियात इस्रायलच्या विमानावर हल्ला झाला तर इस्रायल रशियाची ‘एस-३००’ नष्ट करील – रशियाला इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची धमकी

तेल अविव – ‘‘इस्रायलचे रशियाशी उत्तम संबंध आहेत. पण जर सिरियामध्ये इस्रायलच्या लढाऊ विमानावर हल्ले झाले, तर मात्र रशियाची ‘एस-३००’ असो वा ‘एस-७००’ असो, कुणाचीही पर्वा न करता इस्रायल या यंत्रणा नष्ट करील’’, अशी धमकी इस्रायलने दिली आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री ‘एविग्दोर लिबरमन’ यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा इशारा देऊन इस्रायलच्या तयारीची जाणीव करून दिली आहे. सिरियन लष्कर व सिरियातील इराणच्या तळांचे संरक्षण करण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला, तर इस्रायलकडे रशियाशी टक्कर घेण्याची क्षमता आहे, असा ‘संदेश’ इस्रायली संरक्षणमंत्र्यांच्या या इशार्‍यातून मिळत आहे.

रशियाची ‘एस-३००’ ही हवाई सुरक्षा यंत्रणा सिरियात आधीपासूनच तैनात आहे. पण त्याचा वापर रशियन्सकडूनच केला जातो. अद्याप सिरियन लष्कर व इराणला रशियाने याचा वापर करू दिलेला नाही. त्यामुळे आजवर ही यंत्रणा इस्रायलच्या विरोधात वापरली गेली नाही, अशी माहिती संरक्षणमंत्री लिबरमन यांनी दिली. मात्र रशियाशी इस्रायलचे उत्तम संबंध असले तरी पुढच्या काळात इस्रायलच्या लढाऊ विमानांवर सिरियात हल्ले झाले, तर मात्र इस्रायल रशियाची ही हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केल्यावाचून राहणार नाही, असे सांगून संरक्षणमंत्री लिबरमन यांनी इस्रायलची योजना स्पष्ट शब्दात मांडली.

नऊ दिवसांपूर्वी इस्रायलने सिरियाच्या होम्समधील ‘टी४’ तळावर हल्ला चढवून इराणच्या सात लष्करी सल्लागारांचा बळी घेतला होता. याच्या आधी फेब्रुवारी महिन्यात सिरियात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात इस्रायलला आपले ‘एफ-१६’ विमान गमवावे लागले होते. हे विमान पाडल्याचा दावा सिरियन लष्कराने केला होता. पण त्यामागे ‘एस-३००’ ही रशियाची यंत्रणा होती, असा दावा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर इस्रायलचे संरक्षणमंत्री लिबरमन यांनी केलेला दावा म्हणजे रशियाला दिलेला खरमरीत इशारा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

कुठल्याही परिस्थितीत इस्रायल इराणला सिरियात आपला लष्करी तळ उभारू देणार नाही, असे लिबरमन यांनी याच मुलाखतीत स्पष्ट केले. म्हणूनच सिरियन लष्कराबरोबरच सिरियातील इराणच्या तळांनाही इस्रायल यापुढे लक्ष्य करीत राहील, असे स्पष्ट संकेत लिबरमन यांनी दिले. या कारवाईच्या आड रशियाची यंत्रणा आली, तर इस्रायल रशियाच्या यंत्रणांवर हल्ला चढविल, असे संरक्षणमंत्री लिबरमन स्पष्टपणे सांगत आहेत. मुख्य म्हणजे यासाठी रशियाशी संघर्ष करण्याची धमक इस्रायलकडे आहे, याची जाणीव संरक्षणमंत्री लिबरमन यांनी रशियाला करून दिली. या संघर्षासाठीही इस्रायल तयार आहे, हा संदेश इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी आपल्या मुलाखतीद्वारे दिला आहे.

याआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी रशियाला तीन वेळा भेट देऊन सिरियात इराणच्या लष्करी कारवायांवर चिंता व्यक्त केली होती. रशियाने या कारवायांकडे डोळेझाक करून इस्रायलची सुरक्षा धोक्यात आणू नये, असे आवाहन इस्रायलच्या पंतप्रधानांनी केले. त्याला रशियाकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे वेळ पडलीच तर इस्रायल आपल्या सुरक्षेसाठी रशियाचीही पर्वा करणार नाही, असा निर्णायक इशारा इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिला होता. संरक्षणमंत्री लिबरमन यांनी याच्या पुढे जाऊन इस्रायल रशियाशी टक्कर घेताना कचरणार नाही, असे सांगून नेमक्या शब्दात इस्रायलची तयारी पूर्ण झाल्याचे बजावले आहे.

सिरियातील रशियाच्या हवाई तळावरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला

सिरियातील खेमिम येथील रशियाच्या हवाई तळानजिक ओळख पटविता न आलेल्या गोष्टी रशियन यंत्रणांनी हवेतच उडवून दिल्या आहेत. रशियन लष्कराकडून याबाबतची माहिती उघड करण्यात आली आहे. या ओळख न पटविता आलेल्या गोष्टी म्हणजे लढाऊ विमाने होती, ड्रोन होते की क्षेपणास्त्रे होती. अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गोष्टी आकाराने छोट्या होत्या इतकेच रशियन लष्कराने म्हटले आहे.

२४ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. पण एका संकेतस्थळावर या घटनेवर प्रकाश टाकणारी माहिती आली आहे. रशियन यंत्रणेला ओळख पटविता न आलेल्या या गोष्टी म्हणजे दहशतवाद्यांचे ड्रोन्स होते, असे या संकेतस्थळाने म्हटले आहे. तर इतर माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये ही रॉकेटस् होती, असा दावा करण्यात आला आहे. १ जानेवारी रोजी खेमिम येथील रशियाच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी ड्रोन हल्ले चढविल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण रशियाने या बातम्या फेटाळल्या होत्या.

 

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/989438808843268096
https://www.facebook.com/WW3Info/posts/387137441694746