Breaking News

कुठल्याही क्षणी इस्रायल आणि गाझात युद्धाचा भडका उडेल – संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांचा इशारा

जीनिव्हा – गाझापट्टीतील पॅलेस्टिनींनी इस्रायलच्या सीमेजवळ सुरू केलेली निदर्शने चौथ्या आठवड्यात पोहोचली आहेत. या समस्येवर वेळीच राजकीय तोडगा काढला नाही तर लवकरच निदर्शनांचा भडका उडून इस्रायल आणि गाझापट्टीत युद्ध पेटेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने आखातासाठी नियुक्त केलेले विशेषदूत ‘निकोलाय म्लोदेनोव्ह’ यांनी दिला.

३० मार्चपासून गाझापट्टीतील हमासने इस्रायलच्या सीमारेषेजवळ सुरू केलेल्या निदर्शनांवर इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत ३९ जणांचा बळी गेला आहे. तर या निदर्शनात ५५११ जण जखमी झाल्याचा दावा गाझातील पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकारी करीत आहेत. इस्रायली लष्कराच्या कारवाईत ठार झालेल्यांपैकी निम्मे निदर्शक हमासचे दहशतवादी असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.

चौथ्या आठवड्यात पोहोचलेली ही निदर्शने यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा हमासने दिला असून शुक्रवारी हमासच्या निदर्शकांचा आणखी एक लोंढा इस्रायलच्या सीमेजवळ धडकला. इस्रायलच्या सीमेजवळ सुरू असलेल्या या निदर्शनांवर संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेषदूत ‘म्लोदेनोव्ह’ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

‘आपण इथे चर्चा करीत असताना गाझापट्टीत एकाचवेळी अनेक पातळ्यांवर स्फोट होत आहेत. त्यामुळे गाझापट्टीतील पॅलेस्टिनींनी इस्रायलच्या सीमेजवळ सुरू केलेली ही निदर्शने थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळीच तोडगा काढला नाही, तर इस्रायल आणि हमास यांच्यात नवे युद्ध पेटेल आणि त्याचे गंभीर परिणाम गाझातील पॅलेस्टिनींना भोगावे लागतील’, असे ‘म्लोदेनोव्ह’ यांनी बजावले आहे.

हमासकडून दहशतवादाच्या प्रसारासाठी मुलांचा वापर – निक्की हॅले यांचा आरोप

गाझापट्टीतील इस्रायलविरोधी निदर्शने तसेच दहशतवादी कारवायांसाठी हमास मुलांचा वापर करीत असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी केला. त्याचबरोबर गाझापट्टीतील निदर्शनांची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी हॅले यांनी केली.

‘हमास तोफेच्या तोंडी मुलांना देऊन आपले कुटील हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यांना मुलांची खरीच चिंता वाटत असेल त्यांनी हमासच्या या कारवाया रोखाव्या’, असे हॅले म्हणाल्या. दरम्यान, इस्रायलच्या हद्दीत पाईप बॉम्ब घेऊन शिरणार्‍या दोन पॅलेस्टिनी निदर्शकांना पकडण्यात आल्याचे वृत्त आहे.

 

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info/posts/387859898289167