Breaking News

सिरियातील अमेरिका व रशियाचे युद्ध भयंकर मार्गावर आहे – तुर्कीच्या मंत्र्यांचा इशारा

इस्तंबूल – सिरियात अमेरिका आणि रशियाचे छुपे युद्ध सुरू असून हे युद्ध भयावहरित्या पुढे चालले आहे’, असा इशारा तुर्कीचे सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री ‘नुमान कुर्तल्मुस’ यांनी दिला. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बाशर अल अस्साद यांनी आपल्या देशात महासत्तांचा संघर्ष सुरू असल्याचे नुकतेच एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. हे तिसरे महायुद्ध असल्याची कबुलीही अस्साद यांनी दिली. याला कुर्तल्मुस यांनी दुजोरा दिला असून अमेरिका आणि रशियाचे सिरियामध्ये सुरू असलेले छुपे युद्ध संहारक स्वरुप धारण करील, अशी भीती व्यक्त केली.

नुमान कुर्तल्मुसतुर्कीच्या इस्तंबूल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कुर्तल्मुस बोलत होते. अमेरिका आणि रशिया सिरियामध्ये छुपे युद्ध खेळतच आहेत. हा संघर्ष तीव्र बनत चालला असून यातून सर्वसंहारक युद्धाचा भडका उडेल, या जाणकारांनी दिलेल्या इशार्‍याला कुर्तल्मुस यांनीही दुजोरा दिला. त्याचवेळी या क्षेत्राच्या बाहेरच्या देशांनी आपले लष्कर मागे घेतल्यास, सिरियातील संघर्ष निवळू शकेल, असे आपले मत असल्याचे कुर्तल्मुस यांनी म्हटले आहे. याचे कारण देताना, कुर्तल्मुस यांनी या क्षेत्राच्या बाहेरील देश आपले आडाखे बांधून सिरियात हालचाली करीत आहेत आणि त्यातून विध्वंसक परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला.

सिरियाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ सिरियन जनतेलाच आहे. दुसरा कुणीही आपला निर्णय सिरियन जनतेवर थोपवू शकत नाही, असे सांगून कुर्तल्मुस यांनी याबाबत आदर्शवादी भूमिका घेतली. पण सिरियन राजवटीच्या बाजूने उभे राहणारे रशिया आणि इराण हे देश अस्साद यांची राजवट कायदेशीर असल्याचा दावा करीत आहेत. तर अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबिया व इतर आखाती देश अस्साद यांची राजवट अवैध असल्याचा दावा करीत आहेत.

तसेच अस्साद राजवटीला सिरियाच्या भविष्यात स्थान असू शकत नाही, यावरही अमेरिका व मित्रदेश ठाम आहेत. त्यामुळे सिरियाचा प्रश्‍न चिघळला असून नजिकच्या काळात त्यावर तोडगा निघण्याची शक्यता निकालात निघालेली आहे. म्हणूनच सिरियातील अमेरिका व रशियाचे युद्ध भयंकर मार्गाने पुढे चालल्याचा कुर्तल्मुस यांनी दिलेला इशारा म्हणजे भयावह सूचना असल्याचे स्पष्ट होत आहे.

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info/status/996329648316268544
https://www.facebook.com/WW3Info/posts/393970331011457