आर्टिफिशल इंटेलिजन्सबाबत हेन्री किसिंजर यांचा इशारा

आर्टिफिशल इंटेलिजन्सबाबत हेन्री किसिंजर यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘एलॉन मस्क’ आणि ‘जॅक मा’ यासारख्या अग्रगण्य उद्योजकांसह संशोधक व मान्यवरांनी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या अफाट वेगाने होत असलेल्या अनिर्बंध विकासावर चिंता व्यक्त केली होती. या यादीत आता अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री व ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचाही समावेश झाला आहे. किसिंजर यांनी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी समाजासमोर खड्या ठाकलेल्या संकटांची जाणीव करून दिली आहे. ‘अटलांटिक’ नावाच्या मासिकात किसिंजर यांचा या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला आहे.

हेन्री किसिंजर‘‘बुद्धिबळासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या खेळात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाने अवघ्या काही तासांमध्ये प्राविण्य संपादन करून दाखविले. या खेळात जे प्राविण्य मिळविण्यासाठी मानवजातीला 1500 वर्षांचा कालावधी लागला, ते आर्टिफिशल तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या ‘एल्फाझिरो’ने काही तासात मिळविले. आर्टिफिशल इंटेलिजन्स पुढच्या पाच वर्षात किती प्रगती करील, याचा विचार केलेला बरा’’, असे सांगून किसिंजर यांनी या क्षेत्राच्या विकासाबाबत काही मूलभूत प्रश्‍न उपस्थित केले आहेत. यासाठी किसिंजर यांनी काही उदाहरणेही समोर ठेवली आहेत.

‘ड्रायव्हरलेस कार’ अर्थात स्वयंचलित मोटारी हे वास्तव बनले असून येत्या दशकामध्ये अशा मोटारी सर्वत्र दिसतील. या मोटारी एका कुशल ड्रायव्हरप्रमाणे काम करतील. पण ड्रायव्हिंग करताना, अवचितपणे समोर येणार्‍या समस्या आर्टिफिशल तंत्रज्ञानाद्वारे सोडविता येतील का? वयोवृद्ध आजीआजोबा आणि लहान मूल यांच्यापैकी कुणाला तरी एकाला वाचवायचे असेल तर हे तंत्रज्ञान कसे काम करील? असा सवाल किसिंजर यांनी केला. म्हणूनच या आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणार्‍यांनी याबाबतची ध्येयधोरणे विचारपूर्वक आखायला हवी. अन्यथा आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या अनिर्बंध विकासातून भयंकर समस्या उभ्या राहू शकतात, याकडे किसिंजर यांनी लक्ष वेधले.

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’द्वारे अफाट वेगाने चुकीचे निर्णयही घेतले जाऊ शकतात. या चुका निस्तारण्यासाठी अवधी मिळणार नाही. मानवी बुुद्धिमत्तेच्या वेगाशी त्याची तुलनाच करता येणार नाही. अशा परिस्थितीत या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मानवी जाणीवांची शिस्त लावण्याची आवश्यकता आहे’, असे किसिंजर यांनी बजावले आहे. हा दावा करून किसिंजर यांनी अमेरिकन सरकारने आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या वापरासाठी अध्यक्षीय समितीची स्थापना करावी व यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन किसिंजर यांनी केले आहे. आत्तापासूनच याची सुरुवात केली नाही तर, आपण यासाठी खूपच उशीर केल्याबद्दल पश्‍चाताप करावा लागेल, असा इशारा किसिंजर यांनी दिला.

किसिंजर यांच्याही आधी ‘टेसला मोटर्स’च्या एलॉन मस्क आणि ‘अलिबाबा ग्रुप’चे ‘जॅक मा’ यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे पुढच्या काळात हाहाकार माजणार असल्याचा दावा केला होता. या तंत्रज्ञानामुळे बेकारी प्रचंड प्रमाणात वाढेल आणि हे तंत्रज्ञान तिसरे महायुद्ध पेटवील, असे जॅक मा यांनी बजावले होते. तर ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मध्ये अग्रेसर असलेला देशच पुढच्या काळात जगावर नियंत्रण ठेवेल, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला होता. चीनने आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक सुरू केल्याची माहिती उघड झाली होती. तर या तंत्रज्ञानाचा लष्करी वापर अपरिमित संहार घडवून आणू शकतो, अशी चिंता जगभरातील 116 उद्योजक व संशोधकांनी एका खुल्या पत्राद्वारे केली होती. संयुक्त राष्ट्रसंघटनेला उद्देशून लिहिलेल्या या पत्रात,‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ व ‘रोबोटिक्स’च्या सहाय्याने विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांच्या वापरावर निर्बंध लादण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली होती.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/998553484713709569
https://www.facebook.com/WW3Info/posts/396230477452109