Breaking News

अमेरिकेकडून ‘ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’ची चाचणी

वॉशिंग्टन – ‘बी६१-१२ ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’ची चाचणी केल्याची घोषणा करून अमेरिकेने खळबळ माजविली आहे. ‘ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’ हा अणुबॉम्बपेक्षा अधिक संहारक असून त्याच्या परिणामांची व्याप्ती अणुबॉम्बच्या स्फोटाहून अधिक भयंकर आहेत. त्यामुळे ही चाचणी करून अमेरिकेने रशिया व चीन या आपल्या स्पर्धक देशांना सज्जड इशारा दिल्याचे दिसत आहे. ही चाचणी म्हणजे ट्रम्प प्रशासनाने हाती घेतलेल्या १.२ ट्रिलियन डॉलर्स इतक्या रक्कमेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनाचे भाग असल्याचे सांगितले जाते.

ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब, Gravity nuclear bomb, अमेरिकेची वायूसेना आणि अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या ‘नॅशनल न्यूक्लिअर सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एनएनएसए) यांनी नेवाडा येथे ९ जून रोजी ही चाचणी केली. ‘बी६१-१२ ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’च्या या चाचणीत अणुस्फोटांचा वापर करण्यात आला नव्हता, अशी माहिती अमेरिकेच्या यंत्रणांनी दिली आहे. हा बॉम्ब टाकण्यासाठी ‘बी-२ए’ या बॉम्बर विमानाचा वापर करण्यात आला होता. गेल्या पाच दशकांपासून ‘ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’ अमेरिका तसेच नाटोच्या सदस्य देशांमधील तळांवर तैनात करण्यात आला होता. पण त्याची चाचणी घेण्यात आली नव्हती. अणुहल्ला करण्यासाठी ‘ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’च्या ऐवजी दुसर्‍या अणुबॉम्बचा वापर करण्याची तयारी अमेरिकेने ठेवली होती. याचे कारण हा ‘ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’ अत्यंत विध्वंसक असून याची संहारक क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे अपेक्षेहून भयंकर हानी होऊ शकते, याची जाणीव असल्याने अमेरिकेने हे धोरण स्वीकारले होते.

‘ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’चा विस्फोट अणुबॉम्बपेक्षाही अधिक उंचीपर्यंत विध्वंस माजवू शकतो. तसेच अणुबॉम्बच्या तुलनेत ‘ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’ची व्याप्तीही खूपच मोठी असल्याचे सांगितले जाते. मात्र हा बॉम्ब नक्की किती प्रमाणात हाहाकार माजवू शकतो, याचे तपशील अमेरिकेने उघड केलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर, ‘बी६१-१२ ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्ब’च्या चाचणीचे महत्त्व वाढले आहे. २०२० सालापर्यंत ‘बी६१-१२ ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्बज्’ची निर्मिती पूर्ण होईल, अशी माहिती अमेरिकी यंत्रणांनी केली. अतिप्रगत लढाऊ विमान ‘एफ-३५ लाईटनिंग टू’वर ‘बी६१-१२ ग्रॅव्हिटी न्यूक्लिअर बॉम्बज्’ची तैनाती करण्याची योजना अमेरिकेने तयार केली आहे.

जानेवारी महिन्यात अमेरिकेने ‘न्यूक्लिअर पोश्‍चर रिव्ह्यू’ तयार केला होता. या अहवालात रशिया व चीनसारख्या देशांवर मात करण्यासाठी अमेरिकेने आपली आण्विक क्षमता वाढवावी, अशी शिफारस करण्यात आली होती. याची दखल घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आण्विक क्षमता वाढविण्यासाठी कार्यक्रम हाती घेऊन यासाठी १.२ ट्रिलियन डॉलर्सची तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता.

या रक्कमेपैकी सुमारे ८०० अब्ज डॉलर्स अमेरिकेकडे सध्या असलेल्या अण्वस्त्रांच्या देखभालीसाठी लागणार आहेत. तर ४०० अब्ज डॉलर्स या अण्वस्त्रांच्या आधुनिकीकरणावर खर्च होणार आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info