‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या जहाजांना अमेरिका प्रत्युत्तर देणार – अमेरिकेच्या नौदलप्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – फिलिपाईन्सच्या ‘पाग-असा’ या सागरी क्षेत्रात शेकडो गस्तीनौका रवाना करणार्‍या चीनला अमेरिकेने खडसावले?आहे. ‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रात नौदलाव्यतिरिक्त इतर कुठलीही जहाजे दिसली तर अमेरिकेकडून या जहाजांवर कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिकेचे नौदलप्रमुख ‘अ‍ॅडमिरल रिचर्डसन’ यांनी दिला. चीनच्या उपनौदलप्रमुखांना हा संदेश पोहोचविण्यात आल्याचे अमेरिकेच्या नौदलप्रमुखांनी ब्रिटनमधील एका वृत्तपत्राशी बोलताना स्पष्ट केले.

‘साऊथ चायना सी’च्या सागरी क्षेत्रावर चीन तसेच व्हिएतनाम, फिलिपाईन्स, बु्रनेई, मलेशिया आणि तैवान या देशांनी हक्क सांगितला आहे. आग्नेय आशियाई देश चर्चेद्वारे हा वाद सोडविण्यासाठी तयार आहेत. पण चीनने संपूर्ण ‘साऊथ चायना सी’वर आपला अधिकार सांगून इतर कुठल्याही देशाशी वाटाघाटी शक्य नसल्याचे बजावले होते. या सागरी क्षेत्रावरील आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनकडून व्हिएतनाम, फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात शेकडो मच्छिमार तसेच गस्तीजहाजांची घुसखोरी केली जाते.

काही दिवसांपूर्वी चीनने अशाप्रकारे फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील ‘पाग-असा’ द्वीपसमुहांच्या हद्दीत शेकडो जहाजे रवाना केली होती. यामध्ये मच्छिमार नौकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या जहाजांनी ‘पाग-असा’ द्वीपसमुहाला वेढा घालून फिलिपाईन्सवर दबाव टाकला होता. पण फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी चीनच्या जहाजांवर आत्मघाती हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर अमेरिकेबरोबर येथील सागरी क्षेत्रात युद्धसरावाचे आयोजन करून चीनविरोधात अमेरिकेचे लष्करी सहकार्य घेऊ, असा इशाराही दिला होता.

‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या या अरेरावीविरोधात एका वृत्तपत्राशी बोलताना अ‍ॅडमिरल रिचर्डसन यांनी चीनला स्पष्ट शब्दात खडसावले. ‘‘चीनची गस्तीजहाजे आणि मच्छिमार नौका ह्या नौदलाप्रमाणेच धोकादायक आहेत. त्यामुळे ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या नौदलाच्या हालचालींना अमेरिकेकडून ज्याप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते, त्याच प्रकारे गस्तीजहाजे आणि मच्छिमार नौकांनाही प्रत्युत्तर दिले जाईल’, अशी घोषणा अ‍ॅडमिरल रिचर्डसन यांनी केली. चीनची गस्तीजहाजे व मच्छिमार नौकांवर कारवाईचे स्पष्ट संदेश देऊन अमेरिकन नौदलप्रमुखांनी याकडे आपला देश अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे बजावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info