अमेरिकेतील ‘नॉर्थ फ्लोरिडा’ विद्यापीठाचा चीनच्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ला नकार – अमेरिकी शिक्षणसंस्थांमध्ये चीनचा प्रभाव वाढत असल्याचा सिनेटर मार्को रुबिओ यांचा आरोप

अमेरिकेतील ‘नॉर्थ फ्लोरिडा’ विद्यापीठाचा चीनच्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ला नकार – अमेरिकी शिक्षणसंस्थांमध्ये चीनचा प्रभाव वाढत असल्याचा सिनेटर मार्को रुबिओ यांचा आरोप

‘नॉर्थ फ्लोरिडा’, निर्णय, Confucius Insitiute, North Florida, मार्को रुबिओ, चीन, हस्तक्षेप, अमेरिका, ऑस्ट्रेलियावॉशिंग्टन, दि. 18 (वृत्तसंस्था) – अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील ‘नॉर्थ फ्लोरिडा युनिव्हर्सिटी’ने चीनच्या सहकार्याने सुरू झालेली ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठांच्या उद्दिष्टांशी ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’चे कार्य मेळ खात नसल्याचे कारण पुढे करून हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘नॉर्थ फ्लोरिडा’ विद्यापीठाने स्पष्ट केले. चीनने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर मार्को रुबिओ यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच, देशातील शिक्षणसंस्थांमध्ये चीनचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने चीनविरोधात आक्रमक भूमिकेचा पुरस्कार केला आहे. गेल्या काही महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनविरोधात सुरू केलेले व्यापारयुद्ध चर्चेचा विषय ठरला असून त्याचे जगभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. व्यापाराबरोबरच तंत्रज्ञान व अंतराळ क्षेत्रातील चीनचे वाढते वर्चस्व, सायबरहल्ले, ‘साऊथ चायना सी’मधील हालचाली, तैवान, उत्तर कोरिया, ‘वन बेल्ट, वन रोड’सारखी योजना या बहुतांश मुद्यावर अमेरिकेने चीनविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकी शिक्षणसंस्थांमधील चीनचा हस्तक्षेप हा दोन देशांमधील तणावाचा नवा मुद्दा ठरण्याचे संकेत मिळत आहेत. सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने, चीनकडून अमेरिकी शिक्षणसंस्था व इतर उपक्रमांमध्ये प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा अहवाल सादर केला होता. यात चीनकडून अमेरिकेतील 100 हून अधिक विद्यापीठांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’चा उल्लेख करण्यात आला होता. या माध्यमातून चीन अमेरिकी विद्यापीठांमध्ये चिनी संस्कृती रुजविण्याचा आणि त्याचवेळी आर्थिक सहाय्याच्या बळावर शिक्षणसंस्थांमध्ये वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा इशारा देण्यात आला होता.

‘नॉर्थ फ्लोरिडा’, निर्णय, Confucius Insitiute, North Florida, मार्को रुबिओ, चीन, हस्तक्षेप, अमेरिका, ऑस्ट्रेलियाअमेरिकेची तपासयंत्रणा ‘एफबीआय’नेही अमेरिकी विद्यापीठांमध्ये चालविण्यात येणार्‍या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ केंद्रांची चौकशी सुरू असल्याचे संसदीय सुनावणीत सांगितले होते. अमेरिकी यंत्रणांनी ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ चीनसाठी हेरगिरीच्या जागा म्हणून काम करू शकतात, अशी चिंताही व्यक्त केली होती. याच पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेतील संसद सदस्यांनी नवे विधेयकही सादर केले होते.

या विधेयकात, अमेरिकी विद्यापीठांना परदेशी स्रोतांकडून मिळणारे अर्थसहाय्य तसेच बक्षिसे जाहीर करणे बंधनकारक ठरेल, अशा तरतुदीचा समावेश आहे. त्याचवेळी ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ला अमेरिकी कायद्यांनुसार ‘फॉरेन एजंट’ म्हणून नोंद करणे भाग पडावे, यासाठीही संसदेत प्रयत्न सुरू असल्याचे मानले जाते. यासाठी अमेरिकेचे फ्लोरिडा प्रांतातील सिनेटर मार्को रुबिओ यांनी पुढाकार घेतला आहे. सिनेटर रुबिओ यांनी काही महिन्यांपूर्वी फ्लोरिडा प्रांतातील सर्व शिक्षणसंस्थांनी ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’बरोबरील भागीदारी तोडावी, असे आवाहन केले होते.

‘नॉर्थ फ्लोरिडा’ विद्यापीठाने घेतलेला निर्णय याच आवाहनाचा परिणाम मानला जात आहे. या विद्यापीठापूर्वी अमेरिकेतील तीन प्रमुख शिक्षणसंस्थांनी ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ची शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ‘वेस्ट फ्लोरिडा युनिव्हर्सिटी’, ‘पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी’ व ‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’ यांचा समावेश आहे. अमेरिकी शिक्षणसंस्थांमधील चीनच्या हस्तक्षेपाचा मुद्दा गाजत असतानाच ऑस्ट्रेलियाच्या शिक्षणसंस्थामध्येही चीनने आर्थिक बळाच्या जोरावर हस्तक्षेपाचे प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info