Breaking News

रशियाच्या सिरियातील हवाई हल्ल्यात ८६ हजार दहशतवादी ठार – रशियन संरक्षण मंत्रालयाचा दावा

मॉस्को – गेल्या तीन वर्षांपासून रशियाने सिरियामध्ये चढविलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ८६ हजाराहून अधिक दहशतवाद्यांना तर ८३० टोळी प्रमुखांना ठार केल्याची घोषणा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केली. यासाठी सिरियातील दहशतवाद्यांच्या सुमारे सव्वा लाख ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला.

रशियन संरक्षण मंत्रालय, दावा, अस्साद राजवट, दहशतवादी, हवाई हल्ले, रशिया, इस्रायलरशियन संरक्षण मंत्रालयाच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये सिरियातील संघर्षात रशियाने बजावलेल्या कामगिरीचे तपशील देण्यात आले आहेत. ‘२०११ सालापासून सिरियातील अस्साद राजवट उलथण्यासाठी गृहयुद्ध पेटले आहे. सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या राजवटीविरोधात बंडखोर संघटनांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. या गृहयुद्धाचे पारडे बंडखोर तसेच त्याकाळी सिरियात नव्याने दाखल झालेल्या दहशतवादी संघटनांच्या दिशेने फिरणार असे वाटत असताना, २०१५ साली रशियाने सिरियातील संघर्षात सहभाग घेतला होता, असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

२०१५ सालापासून रशियाने सिरियातील अस्साद राजवटीच्या बचावासाठी दहशतवादी संघटनांविरोधात केलेल्या कारवाईत ८३० टोळी प्रमुखांसह ८६ हजाराहून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला. यामध्ये रशियातून सिरियामध्ये दहशतवादी कारवायांसाठी गेलेल्या ४५०० दहशतवाद्यांचा देखील समावेश होता, असे रशियाने स्पष्ट केले. या दहशतवाद्यांची एक लाख २१ हजाराहून अधिक ठिकाणे नष्ट करण्यात आली व यासाठी रशियाच्या लढाऊ विमानांनी ३९ हजाराहून अधिक उड्डाणे केल्याचे रशियन संरक्षण मंत्रालय सांगत आहे.

दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरील हल्ल्यांमध्ये लढाऊ विमानांबरोबर, पाणबुड्या, विनाशिकांचा वापर करण्यात आला. यापैकी पाणबुड्या आणि विनाशिकांनी १०० हल्ले चढविले. तर या संघर्षात २३१ वेगवेगळ्या आणि प्रगत शस्त्रास्त्रांचा वापर झाल्याचे रशियाने जाहीर केले. सिरियातील या तीन वर्षांच्या संघर्षात रशियाचे ६३ हजाराहून अधिक सैनिक सहभागी झाले होते. तसेच रशियन हवाईदलाच्या ९१ टक्के वैमानिकांना या संघर्षामुळे प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव मिळाला, याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

सिरियातील रशियाच्या या कारवाईनंतर ९६ टक्के भूभाग अस्साद राजवटीच्या नियंत्रणात असल्याचा दावा रशिया करीत आहे. यानंतर रशियन सैनिक सिरियातून माघार घेणार का, हे रशियाने स्पष्ट केलेले नाही. काही महिन्यांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सिरियातून सैन्यमाघारीची घोषणा केली होती. पण अजूनही सिरियाच्या वेगवेगळ्या भागात रशियाचे सैन्य तैनात असल्याची माहिती समोर येत आहे. रशियन लष्कराच्या पोलीस विभागाने इस्रायलच्या सीमेजवळील कुनित्रा क्रॉसिंगजवळच्या सुरक्षा चौकीचाही ताबा घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे सिरियातील रशियाच्या सैन्यमाघारीची शक्यता मावळल्याचे दिसत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info