Breaking News

‘फेडरल रिझर्व्ह’ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आरोप

वॉशिंग्टन – अमेरिकेतील मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. गेल्या वर्षभरात ज्यावेळी अमेरिकी अर्थव्यवस्थेने प्रगती केली त्या त्या वेळी फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवून त्यात खोडा घातला, असा दावाही ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात फेडरल रिझर्व्हने आपले व्याजदर शून्यावर आणून ठेवले होते, असे सांगून फेडरल रिझर्व्ह पक्षपात करीत असल्याचा ठपका ठेवला आहे.

‘फेडरल रिझर्व्ह’, पक्षपात, डोनाल्ड ट्रम्प, अर्थव्यवस्था, शेअर बाजार, शेअरबाजारात घसरण, world war 3, अमेरिका, ओबामाअमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची सूत्रे हाती असलेल्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने गेल्या दीड वर्षात सहा वेळा व्याजदर वाढविले आहेत. या वाढत्या व्याजदरामुळे गुंतवणूकदारांचा अमेरिकेवरील विश्‍वास डळमळीत होत असून शेअर बाजार व अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकी शेअरबाजारात मोठी घसरण झाली असून त्याचा फटका आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांनाही बसला आहे. त्याचवेळी अमेरिकी डॉलर्सचे मूल्यही वाढत असल्याने अमेरिकेच्या कर्जरोख्यांची मागणी कमी होत असून ट्रम्प सरकारला वाढीव दराने कर्ज घ्यावे लागत आहे.

‘फेडरल रिझर्व्ह’मुळे बसत असलेल्या या धक्क्यांमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अस्वस्थ असून त्यांनी त्याविरोधात जोरदार टीका सुरू केली आहे. गेल्याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘फेडरल रिझर्व्ह’ अतिशय वेगाने पावले उचलत असून ‘आऊट ऑफ कंट्रोल’ झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता अमेरिकी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी ‘फेडरल रिझर्व्ह’ थेट अमेरिकी अर्थव्यवस्थेलाच धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

अमेरिकी अर्थव्यवस्था ज्यावेळी प्रगती करीत असते त्याचवेळी फेडरल रिझर्व्हचे प्रमुख व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेऊन त्यात खोडा घालतात. फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांना व्याजदर वाढविल्याने फारच आनंद होत असल्याचे दिसून येत आहे. खरे म्हणजे आता हे सांगणे कदाचित फार घाईचे होईल, पण जेरेमी पॉवेल यांची रिझर्व्हच्या प्रमुखपदी शिफारस केल्याबद्दल मला आता वाईट वाटत आहे’, अशा शब्दात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांना लक्ष्य केले.

ट्रम्प यांनी ओबामा यांच्या कार्यकाळातील शून्य व्याजदराचा उल्लेख करून फेडरल रिझर्व्हने आपल्या कारकिर्दीत पक्षपाती भूमिका घेतल्याचा दावा केला आहे. सध्याच्या स्थितीत ‘फेडरल रिझर्व्ह’ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचा आरोपही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला. ‘फेडरल रिझर्व्ह’च्या प्रवक्त्या मिशेल स्मिथ यांनी राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

‘फेडरल रिझर्व्ह’ अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखण्यात येत असली तरी ही यंत्रणा पूर्णपणे स्वायत्त असून त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व प्रशासन थेट हस्तक्षेप करू शकत नाही. त्याचवेळी अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेपासाठी ‘फेडरल रिझर्व्ह’ला मोठ्या प्रमाणावर अधिकार देण्यात आले असल्याने अमेरिकी अर्थव्यवस्थेवर त्याचे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण असते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यावर सातत्याने टीका करून ही व्यवस्था आपल्याला मान्य नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info