Breaking News

‘आयएनएस अरिहंत’ ‘आण्विक ब्लॅकमेल’ला उत्तर देईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – भारतीय नौदलाची आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ने आपली पहिली सागरी गस्त पूर्ण केली. याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पाणबुडीमुळे भारताला ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ करू पाहणार्‍यांना योग्य ते उत्तर मिळाल्याचे सूचक उद्गार काढले आहेत. ‘आयएनएस अरिहंत’ कार्यान्वित झाल्याने भारत जमिन, आकाश आणि सागरातूनही अणुहल्ले चढवू शकणारा देश बनला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही फार मोठी घटना ठरते, असे सामरिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांनीही ही घटना ऐतिहासिक असल्याचा दावा केला.

‘आयएनएस अरिहंत’, आण्विक ब्लॅकमेल, नरेंद्र मोदी, अणुहल्ले, भारत, INS Arihant, world war 3, धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी ‘आयएनएस अरिहंत’द्वारे देशाला फार मोठी भेट मिळाल्याचे सांगून यावर पंतप्रधान मोदी यांनी समाधान व्यक्त केले. या पाणबुडीच्या समावेशामुळे भारताची सुरक्षा भक्कम होणार असून भारताला ‘आण्विक ब्लॅकमेल’ करू पाहणार्‍यांना योग्य तो इशारा मिळाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत, याची आठवण पाकिस्तानकडून भारताला सातत्याने करून दिली जाते. भारतावर अण्वस्त्रे टाकण्याची मागणी पाकिस्तानचे माथेफिरू नेते व कट्टरपंथीय सातत्याने करीत आले आहेत. शिवाय आपल्या देशाकडे अण्वस्त्रे असल्यानेच कितीही दहशतवादी कारवाया केल्या, तरी भारत आपले काहीही करू शकत नाही, असा समज पाकिस्तानने करून घेतला आहे.

सामरिक विश्‍लेषकांकडून याला पाकिस्तानचे ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ असे म्हटले जाते. मात्र भारताने ‘सेकंड स्ट्राईक’ची अर्थात अणुहल्ला झाल्यानंतर त्याला अणुहल्ल्याद्वारे प्रत्युत्तर देण्याची क्षमता प्राप्त केली असून ‘आयएनएस अरिहंत’मुळे भारताची आण्विक सुरक्षा सुनिश्‍चित झाल्याचा दावा केला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर, भारताच्या पंतप्रधानांनी आण्विक ब्लॅकमेलचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानला इशारा दिल्याचे दिसत आहे. मात्र भारत ही क्षमता कुणालाही छेडण्यासाठी अर्थात आक्रमणासाठी वापरणार नाही, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधानांनी दिली.

भारताची आण्विक क्षमता आक्रमणासाठी नाही, तर संरक्षणासाठी आहे, असे सांगून यासंदर्भातील देशाचे धोरण पंतप्रधांनी स्पष्ट केले. सव्वा अब्ज जनसंख्या असलेल्या देशाचे संरक्षण ‘आयएनएस अरिहंत’कडून केले जाईल, असे सांगून पंतप्रधानांनी ही आण्विक पाणबुडी म्हणजे सार्‍या देशाच्या अभिमानाचा विषय असल्याचा दावा केला. ‘आयएनएस अरिहंत’वरील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांचे तसेच संशोधकांचे पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले. त्यांनी अहोरात्र केलेल्या परिश्रमामुळेच भारतीय बनावटीची व भारतीय शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेली ही पाणबुडी विकसित होऊ शकली, असे पंतप्रधान म्हणाले.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info