Breaking News

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याविरोधात फ्रान्समध्ये पुन्हा ‘यलो वेस्ट्स’ निदर्शनांचा भडका – सातशेहून अधिक निदर्शकांना अटक

पॅरिस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी इंधनदरांवरील करवाढीच्या मुद्यावर मान तुकवल्यानंतरही राजधानी पॅरिससह देशभरात सुरू असलेले ‘यलो वेस्टस्’ आंदोलन अद्यापही शमलेले नाही. सलग चौथ्या आठवड्यात राजधानी पॅरिससह देशभरात १० हजारांहून अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले असून मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. इंधनावरील करांवरून सुरू झालेल्या देशव्यापी आंदोलनात शिक्षक, विद्यार्थी आणि पोलीसही सहभागी झाल्याचे समोर आले असून त्याची व्याप्ती अधिक वाढत चालल्याचा इशारा विश्‍लेषकांनी दिला.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इंधनावर टाकलेल्या करांनंतर देशभरात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. ऑक्टोबर महिन्यात देशाच्या काही भागांमध्ये विरोध दर्शविल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ‘यलो वेस्ट्स’ नावाचे आंदोलन थेट राजधानी पॅरिसमध्ये धडकले होते. सुरुवातीला शांततेत सुरू झालेल्या या निदर्शनांकडे मॅक्रॉन सरकारने दुर्लक्ष केले. मात्र हे दुर्लक्ष सरकारला चांगलेच भोवले असून आंदोलनाची व्याप्ती प्रत्येक आठवड्यात वाढत चालल्याचे समोर येत आहे.

गेल्या आठवड्यात निदर्शकांनी हिंसक रुप घेऊन राजधानी पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावर जाळपोळ व तोडफोड केली. देशाच्या विविध भागांमध्ये रस्ते रोखून वाहतूक व इतर दळणवळण बंद पाडण्यात आले. यात फ्रान्समधील ऐतिहासिक वास्तूही सुटल्या नाहीत. हा हिंसाचार सुरू असताना फ्रेंच सुरक्षायंत्रणांकडून करण्यात आलेली कारवाईही वादाचा विषय ठरली. त्यानंतर आणीबाणीची धमकी देणार्‍या मॅक्रॉन सरकारने एक पाऊल मागे घेऊन इंधनावरील करवाढ सहा महिन्यांसाठी स्थगित करण्याचे जाहीर केले.

या निर्णयानंतर फ्रान्समधील आंदोलन थांबेल हा समज ‘यलो वेस्ट्स’ निदर्शकांनी खोटा ठरविला असून उलट त्याची व्याप्ती वाढत चालल्याचे चौथ्या आठवड्यात दिसून आले. इंधनाच्या मुद्यावरून सुरू झालेल्या निदर्शनांनी मॅक्रॉन सरकारविरोधातील व्यापक आंदोलनाचे रुप घेतले असून त्यात शिक्षक व विद्यार्थ्यांसह पोलीसह सहभागी झाले आहेत. त्याचवेळी फ्रान्स सरकारने सुरक्षायंत्रणेच्या जोरावर आंदोलन दडपण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

शनिवारी राजधानी पॅरिससह इतर भागात होणारी निदर्शने रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी तब्बल ९० हजारांहून अधिक जवान तैनात केले आहेत. त्यात राजधानी पॅरिसमध्ये तैनात केलेल्या १० हजार जवानांचा समावेश आहे. शनिवारी सुरक्षायंत्रणांनी आंदोलन करणार्‍या निदर्शकांची धरपकड सुरू केली असून आतापर्यंत ७०० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.

मात्र राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून उचलण्यात येणारी पावले पुरेशी नसून त्यांचे धोरण चुकल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info