अमेरिकेने रशियाला पराभूत करण्याचा प्रयत्न केल्यास स्वसंरक्षणासाठी रशिया अण्वस्त्रांचा वापर करील

- माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांचा इशारा

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मंगळवारी केलेल्या ‘स्टेट ऑफ युनियन ॲड्रेस’मध्ये युक्रेनमधील लष्करी मोहीम कायम ठेवून सर्व उद्दिष्टे साध्य करण्याची ग्वाही दिली होती. त्याचवेळी पोलंडमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, रशियाला युक्रेन युद्धात जिंकू देणार नाही, असा दावा केला होता. बायडेन यांच्या दाव्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेने रशियावर पराभव लादण्याचा प्रयत्न केला तर रशिया स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रांचा वापर करील, असा इशारा माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला. यावेळी मेदवेदेव्ह यांनी ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’तून बाहेर पडण्याबाबत रशियाने केलेली घोषणा हा अमेरिकेला संदेश असल्याचाही दावा केला.

अण्वस्त्रांचा वापर

रशिया-युक्रेन युद्धाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी परस्परांना इशारे देण्यात येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी युक्रेनला भेट देऊन अतिरिक्त शस्त्रसहाय्याची घोषणा केली. त्याचवेळी युक्रेनची प्रशंसा करून अमेरिका अखेरपर्यंत युक्रेनला शस्त्रपुरवठा व इतर समर्थन कायम ठेवेल, असे आश्वासनही दिले. यावेळी त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची युक्रेनमधील मोहीम अपयशी ठरल्याचा दावाही केला. बायडेन यांची भेट व त्यात केलेल्या वक्तव्यांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मंगळवारी केलेल्या भाषणातून चोख प्रत्युत्तर दिले.

अण्वस्त्रांचा वापर

युक्रेनमधील युद्ध अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनीच सुरू केले असून रशिया ते लष्करी बळाचा वापर करून संपविणार आहे, असे पुतिन यांनी बजावले. त्याचवेळी रशियाला युद्धभूमीवर पराभूत करणे अशक्य असल्याचा इशाराही रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिला होता. त्यावर बोलताना, रशियाला युक्रेन युद्धात जिंकू दिले जाणार नाही असे वक्तव्य अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केले होते. बायडेन यांच्या या वक्तव्याला रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले.

अण्वस्त्रांचा वापर

‘युक्रेन संघर्षात जर अमेरिका रशियाला पराभूत करण्याच्या प्रयत्नात असेल तर त्याचे रुपांतर जागतिक महायुद्धात होऊ शकते. अमेरिका रशियाला हरविण्याची योजना आखत असेल तर रशियाला आपल्या संरक्षणासाठी सर्व प्रकारचे पर्याय वापरण्याचा अधिकार आहे. रशिया कोणत्याही शस्त्राचा वापर करु शकेल, अगदी अण्वस्त्रांचा देखील’, असा इशारा माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला.

यावेळी त्यांनी पुतिन यांनी ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’मधून बाहेर पडण्याबाबत घेतलेल्या निर्णयाकडेही लक्ष वेधले. अमेरिकेतील उच्चभ्रूंना वास्तवाची जाणीव नाही. पण यातून त्यांनी काय साधले, याचा विचार करणे त्यांना भागच पडेल, असे मेदवेदेव्ह यांनी बजावले. फ्रान्स व ब्रिटनसारख्या अण्वस्त्रसज्ज देशांकडून येणाऱ्या प्रतिक्रियेवरही रशियाचे लक्ष असेल, असे सूचक विधानही रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केले आहे. रशिया व अमेरिकेमध्ये तैनात अण्वस्त्रांची संख्या व अण्वस्त्रांच्या चाचण्या यावर मर्यादा घालणारा करार म्हणून ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ ओळखण्यात येते. रशिया-युक्रेन युद्धाला वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने यातून बाहेर पडण्याबाबत घेतलेला निर्णय लक्ष वेधून घेणारा ठरतो. करारातून बाहेर पडल्याने रशिया नव्या अण्वस्त्रांच्या चाचण्या तसेच त्याच्या तैनातीत वाढ करु शकतो, असे मानले जाते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मेदवेदेव्ह यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info