Breaking News

रशियाकडून अण्वस्त्रवाहू ‘पोसायडन’ची चाचणी

मॉस्को – शत्रूच्या विमानवाहू युद्धनौकांचा ताफा तसेच किनारपट्टीजवळ असलेले नौदल-लष्करी तळ आणि इमारती नष्ट करण्याची क्षमता असलेल्या ‘पोसायडन’ या अण्वस्त्रवाहू सागरी ड्रोनची चाचणी रशियाने सुरू केली आहे. रशियाच्या या सागरी ड्रोनपासून कुठल्याही देशाची किनारपट्टी सुरक्षित राहू शकत नसल्याचा इशारा रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, रशियाच्या या ड्रोन चाचणीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

रशियाच्या संरक्षण साहित्यनिर्मिती क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत ‘स्टेटस-6’ किंवा ‘पोसायडन’ या सागरी ड्रोनची चाचणी सुरू झाल्याचे सांगितले. ही चाचणी पुढील काही आठवडे सुरू राहणार आहे. रशियन नौदलातील एका आण्विक पाणबुडीच्या सहाय्याने ही चाचणी सुरू आहे. या चाचणीसाठी रशियन नौदल तसेच हवाईदलाने संबंधित ठिकाणाची सुरक्षा व्यवस्था वाढविल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या ‘पोसायडन’च्या प्रायोगिक मॉडेलची चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर पुढच्या टप्प्यात अणुभट्टी व त्यानंतर अण्वस्त्रांनी सज्ज करून या सागरी ड्रोनची चाचणी घेतली जाईल, असा दावा केला जातो.

‘पोसायडन’ हे सागरी ड्रोन अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राने सज्ज आहे. तसेच हे ड्रोन छोट्या अणुभट्टीने सज्ज असून दीर्घ पल्ल्यापर्यंत ही पाणबुडी प्रवास करू शकते. त्यामुळे अणुभट्टी आणि अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राने सज्ज ‘पोसायडन’ हे रशियाच्या शत्रूंसाठी सर्वात मोठा धोका असल्याचा दावा केला जातो. ‘पोसायडन’ची चाचणी किमान पाच वर्षे सुरू राहणार असून 2027 साली रशियाचे हे सागरी ड्रोन नौदलात सामील होईल, असा दावा केला जातो.

यावर्षी मार्च महिन्यात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर रशियाच्या शस्त्रसज्जतेची तसेच भविष्यातील युद्धाविषयी बोलताना विविध क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, पाणबुड्या व ड्रोन्सची माहिती दिली होती. यामध्ये ‘पोसायडन’चाही समावेश होता. अणुभट्टी व अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या पोसायडन ड्रोनचा शत्रूच्या किनारपट्टीजवळ स्फोट घडविता येऊ शकतो. या स्फोटानंतर समुद्रात मोठ्या उलथापालथी होऊन ‘त्सुनामी’सारख्या प्रचंड लाटा निर्माण होतील व त्या लाटा किनारपट्टीजवळील शत्रूचे नौदलतळ व इतर ठिकाणे नष्ट करू शकतात, अशी माहिती रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिली होती. पण ‘पोसायडन’ची निर्मिती कधी पूर्ण होणार, याबाबत रशियन संरक्षण मंत्रालयाने माहिती प्रसिद्ध केली नव्हती.

मंगळवारी रशियाच्या वृत्तसंस्थेने यासंबंधी माहिती प्रसिद्ध केली आहे. सध्या युक्रेन प्रकरणी रशियाचे अमेरिका व नाटो सदस्य देशांबरोबरच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. ‘सी ऑफ अ‍ॅझोव्ह’ आणि ‘कर्च आखात’ या दोन्ही सागरी क्षेत्रात रशिया तसेच अमेरिका, ब्रिटनच्या युद्धनौकांच्या हालचाली वाढल्या आहेत. या परिस्थितीत, रशियन संरक्षण मंत्रालयाने ‘पोसायडन’ची चाचणी सुरू केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

 English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info