Breaking News

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’वर आधारीत रशियाची किलर रोबोट आर्मी तयार

लंडन – आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा संरक्षण क्षेत्रात वापरामध्ये रशियाने मोठी आघाडी घेतली आहे. या ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रशियाने युद्धक्षेत्रात शत्रूवर घणाघाती हल्ले चढविणारे ‘मिनी टँक’ आणि बॉम्ब हल्ले चढविणारे ‘स्वार्म ड्रोन्स’चे पथक तयार केले आहे. रशियन सरकारने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओमध्ये आपली ‘किलर रोबोट आर्मी’ कुठल्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले. रशियन सरकारच्या प्रचारतंत्राचा भाग असलेली हा व्हिडीओ म्हणजे अमेरिका व मित्रदेशांना इशारा असल्याचा दावा माध्यमे व विश्‍लेषक करीत आहेत.

रशियन सरकारशी संलग्न असलेल्या ‘ऍडव्हान्स रिसर्च फाऊंडेशन’ (एआरएफ) या कंपनीने ‘एआय’वर आधारीत या दोन किलर रोबोट्सची निर्मिती केली आहे. सध्या हे दोन्ही रोबोट्स रशियन लष्कराच्या ताफ्यात आहेत. पण यांचा वापर रिमोटद्वारे केला जातो. मात्र ‘एआय’चा वापर असलेल्या या दोन्ही रोबोट्सना स्वतंत्र कारवाईसाठी युद्धक्षेत्रात पाठविले तर ते कसे काम करतील, याचा नमूना ‘एआरएफ’च्या व्हिडीओमध्ये दाखविण्यात आला आहे.

यापैकी ‘मिनी टँक’कडून बर्फाळ भागात शत्रूच्या ठिकाणावर झालेला हल्ला हा या रणगाड्यासोबत असलेल्या रशियन सैनिकांच्या हल्ल्याहून अधिक विध्वंसक होता, असे सांगण्यात येत आहे. शत्रूच्या प्रतिहल्ल्यापासून बचावासाठी रशियन सैनिकाला सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागतो. पण ‘मिनी टँक’द्वारे शत्रूच्या ठिकाणावर सलग हल्ले केले जातात.

त्याचबरोबर या मिनी टँकमध्ये सर्वात भीषण अशी रायफल आणि बॉम्ब हल्ले चढविण्यासाठी वेगळे कॅनिस्टर देखील आहे.
तर स्वार्म ड्रोन्सचे पथक देखील स्वतंत्र कारवाईसाठी तयार असल्याचा दावा रशियन कंपनी व सरकारने केला आहे. ‘एआय’ची जोड मिळाल्यामुळे या स्वार्म ड्रोन्सच्या सहाय्याने शत्रूच्या ठिकाणांवर सहज हल्ले चढविता येतात, असे रशियन कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे रशियन लष्करासाठी आवश्यक अशी ‘किलर रोबोटची आर्मी’ तयार करण्यात आली असून लवकरच या आर्मीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्माण केलेले किलर रोबोट आर्मी लवकरच दाखल होईल, असा इशारा रशियन संसदेने दिला.

रशियाप्रमाणे चीनने देखील ‘एआय’चा वापर करून रणगाडा, ड्रोन्स आणि गस्तीनौकेची चाचणी घेतली आहे. तर या क्षेत्रात अमेरिका पिछाडीवर असल्याचा दावा अमेरिकेचे लष्करी अधिकारी करीत आहेत. चीन व रशियासारखे देश लष्करी उद्देशांसाठी आर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करीत असल्याचे मान्य करून अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरणाची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info