युक्रेनपासून मारिओपोल स्वतंत्र केल्याची रशियाची घोषणा

मॉस्को/किव्ह – मारिओपोल शहर युक्रेनपासून स्वतंत्र केल्याची घोषणा रशियाने केली आहे. या शहरातील एका पोलाद कंपनीत अजूनही युक्रेनचे दोन हजार जवान रशियन सैन्याच्या वेढ्यात अडकलेले आहेत. या युक्रेनी जवानांनाच काय, पण इथून एखादी माशी सुद्धा बाहेर पडू नये, इतका कडक वेढा घालण्याचे आदेश रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सैन्याला दिले आहेत. रशियाकडून मारिओपोलबाबत ही महत्त्वाची घोषणा करण्यात येत असताना, अमेरिकेने युक्रेनला आणखी 50 कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य घोषित केले आहे. सोबत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी 80 कोटी डॉलर्सचे लष्करी सहाय्यही युक्रेनला पुरविण्याचे जाहीर केले.

मारिओपोल हे युक्रेनचे महत्त्वाचे शहर असून या शहराचा ताबा घेण्यासाठी रशियन सैन्याने मुसंडी मारली होती. युक्रेनली लष्कराचा प्रतिकार रशियन सैन्यासमोर तोकडा पडला व मारिओपोल शहर रशियाच्या ताब्यात आले आहे. मात्र या शहरातील दोन हजार युक्रेनी जवानांनी एका पोलादनिर्मिती करणाऱ्या कंपनीत आसरा घेतला आहे. रशियन लष्कराने वारंवार या जवानांना शरण येण्याचे आवाहन केले होते. पण अजूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

मारिओपोल युक्रेनपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा करीत असतानाच, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या या जवानांना निसटण्याची संधी देऊ नका, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे या युक्रेनी जवानांची शरणांगती रशिया आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला विजय म्हणून प्रदर्शित करणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. या युद्धात रशियाची फार मोठी हानी झाल्याचे दावे करणाऱ्या युक्रेनी सरकार व पाश्चिमात्यांना रशियाच्या मारिओपोलमधील विजयाचा फार मोठा धक्का बसू शकतो.

युक्रेनवरील रशियन लष्कराचे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. त्याचवेळी रशियाची या युद्धात जबरदस्त हानी होत असल्याच दावे पाश्चिमात्यांकडून केले जातात. अशा परिस्थितीत युक्रेनचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अमेरिकेने नव्या सहाय्याची घोषणा केली आहे. युक्रेनी सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, पेंशन व इतर खर्चासाठी अमेरिकेने आणखी 50 कोटी डॉलर्सचे सहाय्य घोषित केले. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनसमोर खड्या ठाकलेल्या आव्हानांवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर अमेरिकेने हे 50 कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य घोषित केले आहे.

याच्या बरोबरीने युक्रेनसाठी सुमारे 80 कोटी डॉलर्सचे शस्त्रसहाय्यही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले. यामध्ये लांब पल्ल्याच्या तोफा व तोफगोळ्यांचा समावेश आहे. तसेच अमेरिकेने रशियावर नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. यानुसार रशियाची जहाजे यापुढे अमेरिकेच्या बंदरावर उतरू शकणार नाहीत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info