Breaking News

चीनची ‘स्वार्म हेलिकॉप्टर्स’ हल्ल्यासाठी सज्ज – ‘ग्लोबल टाईम्स’चा दावा

बीजिंग – हायपरसोनिक क्षेपणास्त्र, इलेक्ट्रोमॅग्नेटिक गन, लेझर यंत्रणेचा लष्करात समावेश करणार्‍या चीनने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या (एआय) क्षेत्रातही आघाडी घेतल्याचे दिसत आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या सहाय्याने तयार केलेले स्वार्म हेलिकॉप्टर्स शत्रूवर हल्ल्यासाठी तयार असल्याचा दावा चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ या मुखपत्राने केला. हे स्वार्म हेलिकॉप्टर्स शत्रूवर मॉर्टर्स, ग्रेनेड हल्ले चढवू शकतात, तसेच गोळीबारही करू शकतात, असे चिनी मुखपत्राने म्हटले आहे.

तुर्कीमध्ये नुकताच एक ‘डिफेन्स ट्रेड शो’ आयोजित करण्यात आला होता. जगभरातील आघाडीच्या देशांमधील संरक्षण कंपन्यांनी विकसित केलेली शस्त्रास्त्रे तसेच उपकरणे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. यामध्ये चीनची ‘झूहै झियान’ या कंपनीचे ड्रोन्स देखील होते. या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन हेलिकॉप्टर्स विकसित करून त्यांची चाचणी घेतली. यामध्ये मिनी ड्रोन हेलिकॉप्टरपासून सहा फूट लांबीच्या ड्रोन हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. यापैकी काही ड्रोन्सचा वेग ताशी १३० किलोमीटर असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.

तुर्कीतील या प्रदर्शनाच्या हवाल्याने ‘ग्लोबल टाईम्स’ने चीनच्या शत्रूंना धमकावले आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर आधारित असलेले हे ड्रोन हेलिकॉप्टर्स मॉर्टर्स, ग्रिनेड आणि मशिनगन्सचा वापर करून मोठा हल्ला चढवू शकतात. एका मोठ्या चिलखती वाहनातून एकाचवेळी दहा ड्रोन हेलिकॉप्टर्स प्रक्षेपित केले जातात. ‘एआय’मुळे या ड्रोन हेलिकॉप्टर्सना पुढील कारवाईसाठी नियंत्रित करण्याची आवश्यकता उरत नाही. हे दहा ड्रोन्स ‘एआय’च्या सहाय्याने समन्वय राखून आपले टार्गेट संपवून आपल्या बेस कॅम्पवर परत येतात, असे ग्लोबल टाईम्सने आपल्या बातमीत म्हटले आहे.

त्यामुळे चीनची ड्रोन हेलिकॉप्टर्स सर्वात घातक ठरतात, असे चिनी मुखपत्राचे म्हणणे आहे. अशाप्रकारे दहा ड्रोन हेलिकॉप्टर्सचे पथक तयार करून मोठे हल्ले चढविले जाऊ शकतात, असे संकेत या मुखपत्राने दिले. त्याचबरोबर ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ आणि ‘स्वार्म तंत्रज्ञाना’च्या क्षेत्रात अमेरिका व रशिया चीनपेक्षा खूपच मागे असल्याचा दावाही या मुखपत्राने केला. याआधी चीनमध्ये आयोजित संरक्षण साहित्याच्या एका प्रदर्शनात चीनने ‘स्वार्म ड्रोन्स’ची सारी माहिती उघड केली होती. त्याचबरोबर एकाचवेळी हजार स्वार्म ड्रोन्स प्रक्षेपित करण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचा दावा चीनने केला होता.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात चीनने ११८० स्वार्म हेलिकॉप्टर्स प्रक्षेपित केले होते. त्यानंतर चीनने ‘एआय’ आणि ‘स्वार्म इंटेलिजन्स’चा वापर लष्करात करण्याची घोषणा केली होती. गेल्याच वर्षी जून महिन्यात चीनने ‘स्वार्म शार्क शिप्स’ देखील लाँच केले होते. एका अज्ञात सागरी क्षेत्रात चीनने या ५० हून अधिक स्वार्म शिप्सची चाचणी घेतली होती. या स्वार्म शिप्सनी शार्क, अमेरिकेची निमित्झ श्रेणीतील अजस्त्र विमानवाहू युद्धनौकेची आकृती तयार केली होती. त्याचबरोबर या स्वार्म शिप्समध्ये विनाशिकांवर मोठा घातपाती हल्ला चढविण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला होता.

दरम्यान, चीनचे हे स्वार्म हेलिकॉप्टर्स आणि शिप्स अमेरिकेसह चीनच्या सर्वच प्रतिस्पर्धी देशांसाठी इशारा ठरत असल्याचे दिसत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info