Breaking News

इराण पुढच्या दहा दिवसात संवर्धित युरेनियमची मर्यादा ओलांडणार – इराणच्या अणुऊर्जा आयोगाची घोषणा

तेहरान – २०१५ साली पाश्‍चिमात्य देशांबरोबर केलेल्या अणुकराराचे उल्लंघन करण्याची घोषणा इराणने केली. पुढच्या १० दिवसात अणुकराराअंतर्गत लादण्यात आलेली युरेनियम संवर्धनाची मर्यादा ओलांडणार असल्याचे इराणच्या अणुऊर्जा आयोगाने जाहीर केले. या दहा दिवसात इराणकडे सहजपणे ३०० किलोहून अधिक संवर्धित युरेनियमचा साठा असेल, असा दावा आयोगाने केला. ही घोषणा इराणला अण्वस्त्रसज्जतेजवळ नेत असल्याचा दावा अमेरिकेतील माध्यमे करीत आहेत.

इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते ‘बेहरूझ कमालवंदी’ यांनी आखातातील अस्थैर्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले निर्बंध २०१५ साली झालेल्या अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप कमालवंदी यांनी केला. ‘जर पूर्वीसारखे इराणवरील निर्बंध मागे घेतले नाही तर इराणलाही अणुकरारातून माघार घेण्याचा पूर्ण अधिकार आहे’, असे कमालवंदी यांनी धमकावले.

अमेरिकेच्या कठोर निर्बंधांचा निषेध म्हणून इराणने याआधीच आपल्या युरेनियम संवर्धनाचा वेग वाढविला होता. गेल्या महिन्याभरात इराणने युरेनियमचे संवर्धन चार पटीने वाढविल्याचे कमालवंदी यांनी लक्षात आणून दिले. याच वेगाने इराण येत्या २७ जूनपर्यंत ३०० किलो संवर्धित युरेनियमचा साठा संपादित करील, असा दावा कमालवंदी यांनी केला. इराणकडील संवर्धित युरेनियमचा हा साठा चार वर्षांपूर्वीच्या अणुकराराचे उल्लंघन ठरते. पण युरोपिय देश त्यांच्या इराणबरोबरच्या अणुकरारावर ठाम असतील तर हा अणुकरार वाचविता येऊ शकतो, असा इशारा कमालवंदी यांनी दिला.

२०१५ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी युरोपिय देशांसह इराणबरोबर अणुकरार केला होता. या कराराअंतर्गत अमेरिका व युरोपिय देशांनी इराणवरील निर्बंध शिथिल केले तसेच इराणला मोठ्या प्रमाणात आर्थिक, व्यापारी सहकार्य दिले होते. पण या अणुकराराच्या आडून इराणने अणुबॉम्बची निर्मिती सुरू ठेवल्याचा आरोप इस्रायल व सौदी अरेबियाने केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेताच इराणबरोबरच्या या अणुकरारातून माघार घेऊन इराणवर कठोर निर्बंध लादले. यामुळे संतापलेल्या इराणने या कराराचे उल्लंघन करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, अणुप्रकल्पातील २० टक्के संवर्धित युरेनियमचा साठा नागरी वापरासाठी पुरेसा असल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे म्हणणे आहे. ही मर्यादा ओलांडून संवर्धित युरेनियमची निर्मिती ही अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी सहाय्यक ठरते. त्यामुळे इराणच्या अणुऊर्जा आयोगाने ३०० किलोहून अधिक संवर्धित युरेनियमचा साठा मिळविण्याची घोषणा करून इराण अणुबॉम्बकडे पावले टाकत असल्याचा संदेश दिला आहे. इराण अण्वस्त्रसज्ज झाला तर आपणही शांत बसणार नसल्याची घोषणा सौदी अरेबियाने याआधीच केली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info