‘बोस्निया’वरून बाल्कनक्षेत्रात रशिया-नाटोमध्ये नवा संघर्ष पेटणार

‘बोस्निया’वरून बाल्कनक्षेत्रात रशिया-नाटोमध्ये नवा संघर्ष पेटणार

मॉस्को/बु्रसेल्स – युरोपातील ‘बाल्कन राष्ट्रां’पैकी एक असलेल्या बोस्नियातील राजकीय तणाव रशिया व नाटोदरम्यान भडकणार्‍या नव्या संघर्षाचे संकेत ठरु शकतात, असा इशारा विश्‍लेषकांनी दिला आहे. बोस्नियात निवडणुका होऊन नऊ महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असून अद्यापही सरकारची स्थापना झालेली नाही. यामागे ‘नाटो’च्या सदस्यत्त्वाचा मुद्दा हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते.

रशिया-नाटो, संघर्ष, मिलोरॅड दॉदिक, नाटो, विरोध, बोस्निया, रशिया, आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांडनाटोने २०१० साली बोस्नियाला सदस्य म्हणून सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. बोस्नियन सरकारचा भाग असणार्‍या ‘बोस्निआक’ व ‘क्रोएट’ गटांची नाटो सदस्यत्त्वाला मान्यता असली तरी ‘सर्ब’वंशियांचा भाग असणार्‍या राजकीय गटाने त्याला जोरदार विरोध दर्शविला आहे. त्यामुळे नाटोच्या आमंत्रणानंतर नऊ वर्षानंतरही बोस्निया नाटोच्या सदस्यत्त्वाची प्रक्रिया पुढे नेऊ शकलेला नाही.

बोस्नियातील राजकीय व्यवस्थेनुसार राष्ट्राध्यक्षपदी तीन गटांच्या नेत्यांची नेमणूक करण्यात येत असून त्यातील एका गटाचा नेता राष्ट्राध्यक्ष म्हणून नेतृत्त्व करतो. सध्या हे राष्ट्राध्यक्षपद सर्बवंशियांचे नेते असणार्‍या मिलोरॅड दॉदिक यांच्याकडे असून ते ‘नाटो’चे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. दॉदिक यांना रशियाचे समर्थन असून त्यांनी अनेकदा रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेटही घेतली आहे.

त्यामुळे दॉदिक यांच्या नाटोविरोधामागे रशियाचा हात असल्याचा दावा बोस्नियातील ‘बोस्निआक’ व ‘क्रोएट’ गटांनी केला आहे. बोस्नियातील राजकीय पेचप्रसंगाचा वापर रशिया नाटो तसेच युरोपिय महासंघाला रोखण्यासाठी करीत असल्याचे मत ब्रिटीश विश्‍लेषक मार्को होआर यांनी व्यक्त केले आहे. बोस्निया अस्थिर ठेवणे रशियासाठी हिताचे असून त्या माध्यमातून रशिया आपले हितसंबंध जपण्यात यशस्वी ठरत असल्याचेही होआर यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षात रशियाने नाटोचे सदस्यत्व मिळविणार्‍या बाल्कन देशांमध्ये अस्थैर्य माजविण्यासाठी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते, याकडेही विश्‍लेषकांनी लक्ष वेधले.

बाल्कन क्षेत्रात बोस्निया, सर्बिया व कोसोवो हे तीन देश वगळता इतर सर्व देशांनी नाटोचे सदस्यत्त्व मिळविले आहे. सर्बिया हा रशियाच्या प्रभावाखाली असल्याने तो देश नाटोचा सदस्य होणे शक्य नाही. तर कोसोवोचा दर्जा अद्यापही वादाच्या भोवर्‍यात आहे. त्यामुळे रशिया कोणत्याही परिस्थितीत बोस्नियावरील आपला प्रभाव राखण्यासाठी धडपड करेल, असे अमेरिकन विश्‍लेषक डॅनिअल सर्वर यांनी म्हटले आहे.

रशियाने बोस्नियात आपल्या गुप्तचर यंत्रणेचे जाळे विणले असून काही निमलष्करी तसेच बंडखोर संघटनांच्या उभारणीसाठीही सहाय्य केल्याचे अहवाल समोर आले आहेत. हे गट व राष्ट्राध्यक्ष दॉदिक यांच्या माध्यमातून रशिया बोस्नियाचा नाटोतील सहभाग टाळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. हे प्रयत्न रशिया व नाटोतील नव्या संघर्षाचे कारण ठरु शकतात, असा विश्‍लेषकांचा दावा आहे.

बोस्नियाची राजधानी साराजेवो येथे १९१४ साली राजपुत्र ‘आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांड’ यांची झालेली हत्या पहिल्या महायुद्धाचे कारण ठरली होती. त्यामुळे या क्षेत्रातील तणावाचे पडसाद जगभरात उमटतात, हे याआधी स्पष्ट झाले होते. त्यामुळे बोस्नियावरून सुरू असलेल्या रशिया व नाटोमधील सुप्त संघर्षाचा भयंकर परिणाम पुढच्या काळात समोर येऊ शकेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info