Breaking News

ब्रिटनकडून रशियाच्या प्रमुख वृत्तसंस्थांवर बंदी

लंडन/मॉस्को – ब्रिटनमध्ये होणार्‍या ‘डिफेन्ड मीडिया फ्रीडम’ परिषदेत रशियन प्रसारमाध्यमांवर बंदी टाकण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने घेतला आहे. रशियाची ‘आरटी’ व ‘स्पुटनिक’ ही प्रसारमाध्यमे खोटी व चुकीची माहिती पसरविण्यात सक्रिय असल्याचा आरोप करून ही बंदी टाकण्यात येत असल्याचे ब्रिटनच्या परराष्ट्र विभागाने जाहीर केले. ब्रिटनने टाकलेली ही बंदी दोन देशांमध्ये सुरू असलेल्या ‘इन्फोर्मेशन वॉरफेअर’चा भाग असल्याचे मानले जाते.

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये १० व ११ जुलैला ‘डिफेन्ड मीडिया फ्रीडम’ नावाने दोन दिवसांची विशेष परिषद आयोजित करण्यात आली आहे. ब्रिटन व कॅनडा अशा दोन देशांनी संयुक्तरित्या या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत विविध देशांचे ६०हून अधिक मंत्री व सुमारे एक हजार पत्रकार सहभागी होणार आहेत. प्रसारमाध्यमांची विश्‍वासार्हता कायम राखणे आणि खोट्या व चुकीच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न रोखण्यासाठी एकजूट हा या परिषदेचा मुख्य अजेंडा असल्याचे सांगण्यात येते.

परिषदेसंदर्भातील माहिती देताना ब्रिटनच्या परराष्ट्र विभागाने रशियाची प्रमुख प्रसारमाध्यमे म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘आरटी’ व ‘स्पुटनिक’वर बंदी टाकल्याची घोषणा केली. रशियाची ही दोन्ही प्रसारमाध्यमे खोटी व चुकीची माहिती पसरविण्यात अग्रेसर आहेत, असे सांगून ही बंदी घालण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी रशियातील इतर माध्यमांच्या पत्रकारांना परिषदेतील सहभागासाठी परवानगी दिल्याची पुस्तीही जोडण्यात आली.

ब्रिटनमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेत अशा रितीने उघडपणे रशियन प्रसारमाध्यमांवर बंदी टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्रिटनच्या या निर्णयामुळे रशिया व ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले ‘इन्फोर्मेशन वॉर’ जोरात असल्याचे संकेत मिळाले आहेत. २०१६ साली झालेली ‘ब्रेक्झिट’ तसेच गेल्या वर्षी माजी रशियन गुप्तहेरावर झालेला विषप्रयोग या घटना दोन देशांमधील ‘इन्फोर्मेशन वॉरफेअर’मधील प्रमुख टप्पे मानले जातात.

ब्रिटनने युरोपिय महासंघातून बाहेर पडावे यासाठी करण्यात आलेल्या प्रचारात रशियाचा सहभाग होता, असे दावे ब्रिटीश माध्यमे, विश्‍लेषक तसेच नेत्यांकडून करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी सर्जेई स्क्रिपल या माजी रशियन हेरावर झालेल्या विषप्रयोगानंतरही दोन देशांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून जबरदस्त संघर्ष पेटला होता. यावेळी रशियन माध्यमांनी ब्रिटीश यंत्रणा तसेच संपूर्ण घटनाक्रमाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर दिशाभूल करणारी माहिती पसरवली, असा दावा ब्रिटीश सरकार व माध्यमांकडून करण्यात येतो. ब्रिटनच्या या दाव्याला अमेरिकेसह युरोपिय देशांनीही समर्थन दिले होते.

याच पार्श्‍वभूमीवर ब्रिटननेही रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेत सायबरहल्ले तसेच इतर माध्यमातून ‘इन्फोर्मेशन वॉरफेअर’ सुरू केल्याचे समोर आले होते. ब्रिटीश सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालांमध्ये रशियाकडून सुरू असलेल्या ‘इन्फोर्मेशन वॉरफेअर’चा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून त्याविरोधात ठोस प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याची भूमिका मांडण्यात आली होती. ब्रिटनच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेली परिषदही त्याचाच भाग असल्याचे सांगण्यात येते. याच परिषदेत रशियाच्या प्रमुख माध्यमांवर बंदी घालत ब्रिटनने रशियाविरोधातील ‘इन्फोर्मेशन वॉर’साठी आपण तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info