Breaking News

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील चीनच्या संपूर्ण आयातीवर कर लादले

वॉशिंग्टन, दि. २ (वृत्तसंस्था) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेतून होणार्‍या चीनच्या संपूर्ण आयातीवर कर लादत असल्याचे जाहीर केले. चीन व चीनचे राष्ट्राध्यक्ष दिलेली आश्‍वासने पाळत नसल्याने हे कर लादण्यात येत असल्याचे सांगून ट्रम्प यांनी नव्या करांचे समर्थन केले. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबरपासून अमेरिकेत आयात होणार्‍या ३०० अब्ज डॉलर्सच्या चीनच्या उत्पादनांवर १० टक्के कर लागू होणार आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीच अमेरिकेत येणार्‍या २५० अब्ज डॉलर्सच्या चिनी उत्पादनांवर २५ टक्के कर लादला आहे.

अमेरिका-चीन व्यापारयुद्धावर तोडगा काढण्यासाठी या आठवड्यात चीनमध्ये दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसून अमेरिकेचे शिष्टमंडळ माघारी आले आहे. या शिष्टमंडळाकडून बैठकीची माहिती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनविरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर केलेल्या ‘ट्विट’मधून ट्रम्प यांनी चीनविरोधातील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

‘अमेरिकी शिष्टमंडळाने भविष्यातील व्यापारी करारासाठी चीनबरोबर नुकतीच चर्चा केली. तीन महिन्यांपूर्वी अमेरिका व चीनमध्ये व्यापारी करार झाला होता. पण चीनने स्वाक्षर्‍या करण्यापूर्वी माघार घेऊन पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या. त्याचवेळी चीनने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने आयात करण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही’, अशा शब्दात चीनने दिलेल्या वचनांवरून माघार घेतल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.

यावेळी ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही लक्ष्य केले. जिनपिंग आपले मित्र असून त्यांनी अमेरिकेत ‘फेन्टाईल’ची विक्री करणार नाही, असे सांगितले होते, असा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केला. मात्र चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आश्‍वासन पाळलेलेच नाही आणि अनेक अमेरिकी नागरिकांचा बळी जात असल्याची नाराजी ट्रम्प यांनी व्यक्त केली. चीन व राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर आरोप करणार्‍या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी पुढे चीनबरोबर व्यापारी चर्चा चालू राहील, असे सांगतानाच अमेरिका चीनच्या उत्पादनांवर नवे कर लादत असल्याचे जाहीर केले.

गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात व्यापारयुद्ध सुरू करताना ५० अब्ज डॉलर्सच्या आयातीवर कर लादले होते. त्यानंतर २०० अब्ज डॉलर्सच्या चिनी उत्पादनांवर सुरुवातीला १० टक्के व नंतर २५ टक्के कर लादून ट्रम्प यांनी हे व्यापारयुद्ध अधिकच तीव्र केले. याच काळात चीनने प्रत्युत्तर देताना अमेरिकेतून चीनमध्ये निर्यात होणार्‍या ११० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर कर लादले होते. अमेरिका-चीन व्यापारात अमेरिकेकडून होणारी आयात ५०० अब्ज डॉलर्सहून अधिक असून ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यानंतर या संपूर्ण आयातीवर कर लागू झाले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी बँकॉकमधील एका बैठकीत चीनच्या व्यापारी धोरणावर कडवट टीका केली. ‘चीन त्यांच्या संरक्षणवादी व दुसर्‍यांना गिळणार्‍या व्यापारी धोरणांमध्ये सुधारणा करीत नाही तोपर्यंत आशियाई देशांनी चीनशी सहकार्य करु नये’, असे पॉम्पिओ यांनी बजावले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info