अण्वस्त्रांचा ताबा ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’कडे देणे घातक ठरेल – अमेरिकेच्या माजी संरक्षण उपमंत्र्यांचा इशारा

अण्वस्त्रांचा ताबा ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’कडे देणे घातक ठरेल – अमेरिकेच्या माजी संरक्षण उपमंत्र्यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘अण्वस्त्रांच्या कमांड व कंट्रोल’ यंत्रणेत आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर असलेल्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे, अशी कल्पना करून पहा. आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित या यंत्रणेला काही विशिष्ट परिस्थितीत थेट अण्वस्त्रे प्रक्षेपित करता येण्याचा हक्क दिलेला आहे. अशी यंत्रणा असणे ही बाबच अतिशय धोकादायक स्थितीचे संकेत देणारी ठरते’, असा इशारा अमेरिकेचे माजी उपसंरक्षणमंत्री रॉबर्ट वर्क यांनी दिला.

गेल्या महिन्यात लष्कराशी संबंधित एका वेबसाईटवर ‘अमेरिका नीड्स अ डेड हँड’ नावाने एक लेख प्रसिद्ध झाला होता. अ‍ॅडम लॉथर व कर्टिस मॅक्गिफिन या दोन प्राध्यापकांनी लिहिलेल्या लेखात, अमेरिकेच्या अण्वस्त्रांची जबाबदारी असणार्‍या यंत्रणेत, ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’वर आधारित ‘ऑटोमेटेड स्ट्रॅटेजिक रिस्पॉन्स सिस्टिम’ हवी, अशी शिफारस करण्यात आली होती. अमेरिकेला असलेला रशिया व चीनच्या अण्वस्त्रांचा धोका आणि अमेरिकी नेतृत्वाला त्याला प्रतिसाद देण्यासाठी लागणारा वेळ यांचा विचार करून, अशा प्रकारे यंत्रणा गरजेची असल्याचे त्यांनी म्हटले होते.

या लेखातील अण्वस्त्रांची हाताळणी करणार्‍या यंत्रणेत ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर या संकल्पनेवर प्रचंड टीका सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षात जगातील विविध देशांच्या संरक्षणदलांमध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाचा वापर असणार्‍या घातक यंत्रणा दाखल होत आहेत. त्याबाबतचे नियम व इतर बाबींच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार वादविवाद सुरू आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाकडून हा मुद्दा हाताळण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्र गटही स्थापन करण्यात आला आहे.

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाचा वापर असणार्‍या घातक यंत्रणांना ‘किलर रोबोट्स’ अशी संज्ञा वापरण्यात येत असून त्याविरोधात व्यापक मोहीम छेडण्यात आली आहे. जगातील विविध तज्ज्ञ, विश्‍लेषक तसेच उद्योजकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडून मानवजातीचा विनाश होण्यापर्यंतचे गंभीर इशारे देण्यात आले आहेत. अमेरिकेचे माजी उपसंरक्षणमंत्री रॉबर्ट वर्क यांनी दिलेला इशाराही त्याचाच भाग दिसत आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत, आर्टिफिशल इंटेलिजन्स व रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करण्यात येणार्‍या ‘किलर रोबोट्स’ची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे ‘किलर रोबोट्स’ कोणालाही ठार करताना दया अथवा नैतिकता दाखविणार नाहीत, असे बजावण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात, ‘किलर रोबोट्स’च्या मुद्यावर जगातील प्रमुख देशच अडथळे बनल्याचा आरोप करून त्यात अमेरिका, रशिया, ब्रिटन, इस्रायल व ऑस्ट्रेलिया या देशांचा उल्लेख करण्यात आला होता.

अमेरिकेचे माजी उपसंरक्षणमंत्री असणार्‍या रॉबर्ट वर्क यांनी आपल्या इशार्‍यात, चीनच्या संरक्षणदलात आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित ‘न्यूक्लिअर कमांड’ यंत्रणा असली आणि त्या यंत्रणेने अमेरिका हल्ला चढविणार असल्याचे संदेश देऊन ‘प्रिएम्टिव्ह स्ट्राईक’चा आदेश दिला तर काय होईल, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. सध्या किलर रोबोट्स विरोधात सक्रिय असणारे गट अशा गोष्टींबाबत काहीही करु शकत नाही व ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे, असा दावाही वर्क यांनी केला आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info