अफगाणिस्तानच्या लष्कराला पाकिस्तानची धमकी – अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांचा आरोप

आरोप

काबुल – अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील स्पिन बोल्दाक चौकी तालिबानच्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न अफगाणी लष्कराने केला, तर पाकिस्तानचे हवाई दल अफगाणी लष्करावर हल्ले चढविल, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे. अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी हा आरोप केला. हा आरोप सिद्ध करणारे पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगून उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश करण्याची तयारी केली आहे. यामुळे तालिबानशी आपला संबंध नसल्याचा दावा करणार्‍या पाकिस्तानचे पितळ उघडे पडू शकेल.

दोन दिवसांपूर्वी तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतातील पाकिस्तान सीमजवळील स्पिन बोल्दाक चौकीचा ताबा घेतला. तालिबानच्या दहशतवाद्यांनी स्पिन बोल्दाक-चमन ‘फ्रेंडशिप गेट’वरील अफगाणी राष्ट्रध्वज काढून तालिबानचा ध्वज फडकवला आहे. अफगाण-पाकिस्तानातील व्यापारी वाहतूकीसाठी महत्वाच्या असलेल्या स्पिन बोल्दाक सीमेवरील तालिबानचे नियंत्रण धोकादायक ठरते. कारण व्यापारी वाहतूकीद्वारे मिळणार्‍या जकातावर तालिबानचे दहशतवादी आपली तिजोरी भरून घेतील व अफगाणी सरकारविरोधात वापर करतील, अशी भीती व्यक्त केली जाते. तसेच या सीमेवरून तालिबानचे दहशतवादी अंमली पदार्थांची तस्करी सुरू करू शकतात.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/pakistan-threatens-afghan-army/