Breaking News

जागतिक महायुद्धासाठी अमेरिकी लष्कराची तयारी सुरू – अमेरिकेचे नवे लष्करप्रमुख जनरल जेम्स मॅक्कॉनव्हिल

वॉशिंग्टन – अमेरिकी लष्कराच्या तुकड्या देशात असलेल्या तळांवर बसण्यापेक्षा जगाच्या कानाकोपर्‍यात तैनात होऊन संघर्षासाठी सज्ज असायला हव्यात, अशा शब्दात अमेरिकेचे नवे लष्करप्रमुख जनरल जेम्स मॅक्कॉनव्हिल यांनी जागतिक महायुद्धासाठी अमेरिकेची तयारी सुरू झाल्याचे संकेत दिले. सौदी अरेबियातील इंधनप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांनंतर अमेरिकेने आखातात अतिरिक्त तैनातीची घोषणा केली आहे. त्याचवेळी तालिबानबरोबरील शांतीचर्चा फिस्कटल्यानंतर अफगाणिस्तानमधील संघर्षाची व्याप्तीही तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्या लष्करप्रमुखांचे संकेत लक्ष वेधून घेणारे ठरतात.

‘अमेरिकी लष्कराची एखादी ब्रिगेड फोर्ट कॅम्पबेलमध्ये कार्यरत असणे हे सज्जतेच्या दृष्टिने योग्यच आहे. पण मला ही ब्रिगेड अमेरिकेच्या हितसंबंधांच्या दृष्टिने जगाच्या कोणत्याही भागात तातडीने तैनात करणे आवश्यक आहे. त्यासाठी ती विमानातून किंवा युद्धनौकेतून, कोणत्याही मार्गाने लवकरात लवकर तैनात व्हायला हवी. जगाच्या कोणत्याही भागात अमेरिकी लष्कराची तुकडी तैनात असणे किंवा ताबडतोब तैनात करता येणे हीच सामरिक सज्जता ठरते आणि यालाच माझे प्राधान्य असेल’, असे सांगून जनरल जेम्स मॅक्कॉनव्हिल यांनी आपले धोरण स्पष्ट केले. 

आपली भूमिका अधिक विस्ताराने मांडताना अमेरिकेच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या ‘नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटेजी’चा उल्लेख केला. यापुढील काळात अमेरिकी लष्कराच्या तैनातीचा कल ‘नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटेजी’मध्ये सूचित करण्यात आलेल्या प्राधान्यक्रमानुसार ठरेल, असे जनरल जेम्स मॅक्कॉनव्हिल यांनी स्पष्ट केले.

‘नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटेजीमध्ये निश्‍चित करण्यात आलेल्या प्राधान्यानुसार जगाच्या विविध भागांमध्ये अमेरिकी लष्कराची तैनाती होईल व सरावही आयोजित केले जातील. सामरिक धोरण व डावपेचांनुसार लष्करी तुकड्यांची तैनाती करण्यात येईल. त्यात जगातील अशा भागांचाही समावेश असेल की जे अमेरिकेपासून सहज जाता येईल, अशा प्रकारात मोडणारे नसतील. युरोपात मोठा सराव आयोजित करतानाच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही भव्य सरावाचे आयोजन केले जाईल’, असे जनरल जेम्स मॅक्कॉनव्हिल म्हणाले.

एखाद्या ठिकाणी गरज भासल्यावर अथवा घटना घडल्यावर लष्करी तुकड्या पाठविण्याची घाई करण्याऐवजी अमेरिकी लष्कर सज्जतेच्या बाबतीत काळाच्या पुढे राहून त्या क्षेत्रात आधीच तैनात असेल, असा दावा अमेरिकेच्या लष्करप्रमुखांनी केला. एका संरक्षणविषयक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकी लष्कराच्या तैनातीसाठी प्राधान्यक्रम व आवश्यक पाया तयार करणे यावर आपण भर देऊ, असेही सांगितले. युरोपबरोबरच पॅसिफिक क्षेत्र व आशियाई देशांना यात महत्त्व असेल, असे लष्करप्रमुख जनरल मॅक्कॉनव्हिल यांनी स्पष्ट केले.

आखातातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने या क्षेत्रातील तैनाती वाढविण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी ‘साऊथ चायना सी’मध्ये चीनच्या आक्रमक हालचाली लक्षात घेता ऑस्ट्रेलियातील अमेरिकी संरक्षणतळांची व्याप्तीही वाढविण्यात येत आहे. चीननजिक असलेल्या आग्नेय आशियाई देशांसह, दक्षिण कोरिया व जपानमधील तैनातीतही बदल होऊ शकतात, असे संकेत नव्या लष्करप्रमुखांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.

 English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info