तुर्कीच्या सिरियातील आक्रमणाविरोधात अस्साद राजवट व कुर्दांची हातमिळवणी – तुर्कीच्या सीमेजवळ सिरियन लष्कराची तैनाती

तुर्कीच्या सिरियातील आक्रमणाविरोधात अस्साद राजवट व कुर्दांची हातमिळवणी – तुर्कीच्या सीमेजवळ सिरियन लष्कराची तैनाती

दमास्कस – तुर्कीने सिरियाची सीमा ओलांडून कुर्दांवर चढविलेल्या भीषण हल्ल्यात ५०० हून अधिकजणांचा बळी गेला असून दीड लाखाहून अधिकजण विस्थापित झाले आहे. यानंतर सिरियाची अस्साद राजवट आणि कुर्द बंडखोरांनी आपले मतभेद बाजूला सारून तुर्कीच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ही गेल्या सात वर्षापासून सुरू असलेल्या सिरियातील घनघोर संघर्षाला कलाटणी देणारी घटना ठरते. आपल्या ताब्यातील कोबानी व मनबीज ही शहरे कुर्द बंडखोरांनी आता सिरियन लष्कराच्या हवाली केली आहेत. यामुळे तुर्कीच्या हल्ल्यांना सिरियन लष्कर आणि कुर्द एकजुटीने प्रत्युत्तर देतील, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

वर्षभरापूर्वी सिरियन लष्कर आणि कुर्द बंडखोरांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. कुर्दांच्या भागातील इंधनसाठ्यांचा ताबा घेण्यासाठी अस्साद यांच्या लष्कराने घणाघाती हल्ले चढविले होते. तर अस्साद राजवटीविरोधात सिरियन बंडखोरांनी पुकारलेल्या संघर्षात कुर्दांनीही सहभाग घेतला होता. त्यामुळे गेली काही वर्षे सिरियाला विभागणार्‍या युफ्रेटस नदीच्या पूर्वेकडील भागावर कुर्दांचे तर पश्‍चिमेकडील भागावर अस्साद राजवटीचे नियंत्रण होते.

यामुळे सिरिया दोन भागात विभागला गेल्याचे दिसत होते. यापैकी सिरियातील इंधनसाठा आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेली कोबानी, मनबीज, राक्का, देर अल-झोर ही शहरे कुर्दांच्या ताब्यात आली होती. गेल्या वर्षी रशियाने लागू केलेल्या संघर्षबंदीनंतर अस्साद राजवट व सिरियन बंडखोरांमधील संघर्ष बर्‍याच प्रमाणात कमी झाला.

अशा परिस्थितीत, गेल्या सहा दिवसांपासून तुर्कीच्या लष्कराने सिरियाची सीमारेषा ओलांडून हल्ले सुरू केल्यानंतर सिरियातील समीकरणे बदलली आहेत. तुर्कीचे आक्रमण सिरियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप अस्साद राजवट करीत आहे. तर ‘आयएस’च्या दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी तुर्की आपल्या जनतेला लक्ष्य करीत असल्याचा आरोप कुर्द नेते करीत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, अस्साद राजवट आणि कुर्दांमध्ये तुर्कीच्या विरोधात एकजूट झाली आहे. रशियाने मध्यस्थी करून अस्साद राजवट व कुर्दांमध्ये हातमिळवणी घडवून आणल्याचे दावे केले जातात. यानुसार तुर्कीच्या सीमेजवळील कोबानी आणि मनबीज ही दोन महत्त्वाची शहरे कुर्दांनी सिरियन लष्कराच्या हवाली केली आहेत. त्याचबरोबर ‘सारी कानी’ या कुर्दांच्या ठिकाणावरही सिरियन लष्कर तैनात झाले आहे. तर सिरियाच्या वायव्येकडील भागाचा ताबा असलेले तुर्कीचे लष्कर व तुर्कीसंलग्न सिरियन बंडखोर मनबीजवर हल्ल्यासाठी रवाना झाले आहेत.

त्यामुळे येत्या काही तासात तुर्कीच्या लष्कराच्या हल्ल्याला सिरियातील अस्साद राजवट आणि कुर्द बंडखोर एकजूटीने उत्तर देतील, असे संकेत मिळत आहे. असे झाले तर सिरियातील गृहयुद्धाचे रुपांतर दोन देशांमधील संघर्षात होऊ शकेल.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info